नवी दिल्ली : इंडिया आघाडीची एक महत्त्वाची बैठक दिल्लीत झाली. या बैठकीत घडलेल्या एका घटनेनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हिंदी राष्ट्रीय भाषा असून ती सर्वांना माहिती असली पाहिजे, अशा आशयाचे विधान केले. दक्षिण भारतातील नेत्यांना उद्देशून केलेल्या या विधानानंतर आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अध्यात्मिक गुरू सद्गुरू यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत यावर भाष्य केले आहे.
इंडिया आघाडीच्या बैठकीत नितीश कुमार हिंदीतून संबोधित करत असताना हिंदी भाषेवरून वाद निर्माण झाला. डीएमके नेते टीआर बालू यांनी आरजेडी खासदार मनोज झा यांना नितीश कुमार यांच्या संबोधनाचे इंग्रजीत भाषांतर करण्याची विनंती केली होती. मनोज झा यांनी परवानगी मागितली असता नितीश कुमार चिडले आणि म्हणाले की, आपण आपल्या देशाला हिंदुस्थान म्हणतो आणि हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. ही भाषा आपल्याला समजली पाहिजे, असे सांगत भाषणाचा अनुवाद करण्यास नकार दिला. सद्गुरू यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये नितीश कुमार यांच्या विधानावर स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
आदरणीय नितीश कुमार, हिंदुस्थान म्हणजे हिमालय आणि सागर यांच्यामध्ये वसलेली भूमी किंवा हिंदूंची भूमी, हिंदी भाषेची भूमी नाही. भाषा बोलणा-या लोकसंख्येमध्ये मोठा फरक असला तरी, देशातील सर्व भाषांना समान दर्जा मिळेल, या उद्देशाने राज्यांची भाषिक विभागणी करण्यात आली आहे. आपणास विनंती आहे की, अशी क्षुल्लक विधाने टाळावीत. कारण अशी अनेक राज्ये आहेत ज्यांची स्वत:ची भाषा, साहित्य आणि संस्कृती आहे, असे सद्गुरू यांनी आपल्या एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
नितीश कुमार यांचा संयम सुटला
इंडिया आघाडीतील पक्षांमधील आपापसातील मतभेदाच्या बातम्या समोर येत आहेत. दिल्लीत झालेल्या बैठकीत नितीश कुमार यांचा संयम सुटला आणि त्यांनी हिंदी भाषेवरून आपल्याच मित्रपक्षाच्या नेत्याला सुनावले. द्रमुकची भूमिका आणि त्यांचे राजकारण हे नेहमी ंिहदीविरोधी राहिले आहे. अशा परिस्थितीत या भाषावादावरून इंडिया आघाडीत मतभेद समोर आले आहेत.