पुणे : पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकावर उभ्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार करणा-या आरोपीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली आहे. आरोपीच्या प्राथमिक वैद्यकीय तपासणीत त्याच्या गळ्यावर दोरीचे व्रण (वळ) आढळून आलेत. पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी यावेळी ही माहिती दिली.
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर शिवशाही बसमध्ये झालेल्या अत्याचार प्रकरणामुळे अवघ्या महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला गुरुवारी मध्यरात्री शिरुर तालुक्यातील गुनाट गावातून अटक केली आहे. त्याला लवकरच कोर्टात हजर करण्यात येणार आहे. तत्पूर्वी, करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत त्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले आहे.
गळफास घेतल्याच्या दोरीच्या खुणा
पत्रकारांनी याविषयी येथे आयोजित पत्रकार परिषदेत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना प्रश्न केला. त्यावर ते म्हणाले, प्राथमिक वैद्यकीय चाचणीनुसार आरोपीच्या गळ्यावर दोरीचे व्रण आहेत. या व्रणानुसार आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आरोपीने तशी कबुली दिली. मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. दोरी तुटल्यामुळे व वेळीच इतर लोक धावून मदतीस आल्यामुळे आपला जीव वाचला असे त्याने सांगितले आहे. आता आरोपीने खरेच आत्महत्येचा प्रयत्न केला होता का? याची शहानिशा करण्यासाठी घटनास्थळी तपास पथक पाठवण्यात येणार आहे. पण प्राथमिक वैद्यकीय चाचणीनुसार त्याच्या गळ्यावर दोरीचे वळ होते.
शेवटची टीप देणा-याला १ लाखाचे बक्षीस
पोलिसांनी या प्रकरणी एकदम शेवटी मिळालेल्या खबरीनुसार आरोपीला अटक केली. त्यात आरोपी कुठेतरी पाणी पिण्यासाठी आल्याचे सांगण्यात आले होते. आरोपी पाणी पिण्यासाठी आला असता तो एका व्यक्तीला दिसला. त्याने ती खबर पोलिसांनी दिली. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेला. त्यानंतर ड्रोनच्या मदतीने दिसलेल्या त्याच्या दिशेतून त्याला अटक करण्यात आली. त्यामुळे ही खबर देणा-या व्यक्तीला १ लाखाचे बक्षीस दिले जाईल.