पुणे : हिंजवडी जळीतकांड प्रकरणातील चालक जनार्दन हंबर्डीकरला रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता पोलिसांनी आरोपीला कोर्टात हजर केले होते. त्याला कोर्टाने २९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पुण्याच्या हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हलच्या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. मात्र हा अपघात नसून घातपात असल्याचे समोर आले होते. दिवाळीचा बोनस न दिल्याने आणि इतर कामेही सांगितल्याचा राग झाल्याने चालकानेच गाडीतील कामगारांना संपवल्याचे उघडकीस आले आहे. जनार्दन हंबर्डीकर असे या चालकाचे नाव आहे. नियोजनबद्ध कट रचून त्याने हा प्रकार केला असल्याचे समोर आले मात्र या चालकाने कंपनीवर जे आरोप केले, ते कंपनी मालकाने फेटाळून लावले लावले.
त्यानंतर आज अखेर चालक जनार्दन हंबर्डीकरला पोलिसांनी ताब्यात घेतले. टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवल्यानंतर चालकाचा ही पाय यात भाजला होता तर चौघांचा होरपळून मृत्यू झाला होता. तसेच अन्य पाच कर्मचारी ही गंभीर जखमी झाले होते. १९ मार्चला ही घटना घडली. तेंव्हापासून चालक मेडिकल कस्टडीमध्ये उपचार घेत होता. आज डिस्चार्ज मिळताच हिंजवडी पोलिसांनी हंबर्डीकरला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीला कोर्टात हजर केले असता त्याला २९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.