लातूर : विनापरवाना गावठी पिस्टल, जिवंत काडतुसे बाळगणा-या आरोपीला पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्याच्याकडून १ लाख ९३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत विवेकानंद चौक ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले, सण-उत्सव काळात सार्वजिक शांतता भंग करणा-या, दहशत निर्माण करणा-या, रेकॉर्डवरील, विनापरवाना शस्त्र बाळगणा-यांची माहिती संकलित करावी. त्यांच्यावर कारवाई करावी, असे आदेश पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिले.
यानुसार विविध पोलिस ठाण्यांकडून कारवाई केली जात आहे. विवेकानंद चौक ठाण्याचे पथक बुधवारी पहाटेच्या सुमारास गस्तीवर होते. खब-याने माहिती दिली, नवीन रेणापूर नाका ते नवीन नांदेड नाका रिंगरोडवर विनापरवाना गावठी पिस्टल बाळगत एक तरुण फिरत आहे. पोलिसांनी सापळा रचून दुचाकीसह (एम.एच. २४ ए.एन. ३२४०) त्यास ताब्यात घेतले. चौकशी केली असता, त्याने अलोक विश्वनाथ चौधरी (वय ३६, रा. अंबाजोगाई रोड, लातूर) असे नाव सांगितले. पोलिसांनी पिस्टल, १७ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण, डीवायएसपी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली विवेकानंद चौक ठाण्याचे पोनि. संतोष पाटील, पोउपनि. सचिन रेडेकर, खुर्रम काझी, यशपाल कांबळे, रणवीर देशमुख, गणेश यादव, धैर्यशील मुळे, सचिन राठोड, आनंद हल्लाळे यांच्या पथकाने केली आहे.