परभणी : परभणी जिल्ह्यातील बोरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत बनावट सोन्याचे शिक्की कमी किंमतीत देण्याचे आमिष दाखवून कर्नाटक राज्यातील व्यापा-याला मारहाण करून ११ लाख रूपयांचा मुद्देमाल घेऊल आरोपींनी दि. ८ जानेवारी रोजी पळ काढला होता. या आरोपींना अवघ्या ६ तासांत जेरबंर करण्यात आले आहे. आरोपींकडून ८ लाख ५० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बोरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत दि.८ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास बोरी ते वाघी जाणा-या रस्त्यावर मारोती कृष्णा कोळेकर (२९) सराफा व्यापारी (रा. मोळे ता. हातणी, जि. बेळगाव राज्य कर्नाटक) यांना सोन्याचे सिक्के कमी किंमतीत देतो म्हणून त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर कोळेकर यांचे नगदी १० लाख रूपये व इतरांचे मोबाईल घेवून संबंधितांना मारहान करून आरोपींनी पळ काढला होता. या प्रकरणी सराफा व्यापारी कोळेकर यांनी बोरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून बोरी पोलिस स्टेशन व स्थागुशाचे पथक रवाना केले.
स्थागुशाचे पो.नि. विवेकानंद पाटील व त्यांच्या पथकाने आरोपी मालनबाई सोमनाथ पवार (७३), परमेश्वर गणू शिंदे (७४), जगन्नाथ जापान काळे (४१) तिघेही रा. कमलापूर ता.पूर्णा यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यात चोरून नेलेले ८ लाख ५० हजार रूपये ताब्यात घेऊन त्यांना बोरी पोलिस स्टेशनला हजर करण्यात आले. तसेच पोलिस स्टेशन बोरी येथील सपोनि. सुनिल गोपीनवार, पोउपनि. सचिन सोनवणे यांच्या पथकाने अजय धनराज गायकवाड (३०) रा. उजनी ता. अहमदपूर, विठ्ठल राम ससाणे (३२) रा. अहमदपूर, विनोद शेषराव डांगे ( २८) रा. लोहा कुंभारवाडी यांना ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी जिंतूर जिवन बेनिवाल, स्थागुशा पो.नि. विवेकानंद पाटील, सपोनि. पी.डी. भारती, सुनिल गोपीनवार, पोउपनि. अजित बिरादार, चंदनसिंह परीहार, सचिन सोनवणे, पोलिस अंमलदार सुग्रीव केंद्रे, सिध्देश्वर चोटे, नामदेव डुबे, राम पौळ, जयश्री आव्हाड, संजय घुगे, शंकर गायकवाड, अनिल शिंदे, हरी गायकवाड यांच्या पथकाने मिळून केली. अवघ्या सहा तासांत आरोपी जेरबंद करण्यात आल्याने पोलिसांच्या कामगिरीचे कौतूक होत आहे.