अयोध्या : वृत्तसंस्था
श्री रामजन्मभूमीचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांचे बुधवार, १२ फेब्रुवारी रोजी निधन झाले. ८७ वर्षीय सत्येंद्र दास यांची प्रकृती ब्रेन स्ट्रोकमुळे बिघडल्याने त्यांना रविवारी लखनौच्या एसजीपीजीआयमध्ये दाखल करण्यात आले होते.
त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबही होता. रुग्णालयाने जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, अयोध्या राम मंदिराचे मुख्य पुजारी श्री. सत्येंद्र दासजी यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांना ३ फेब्रुवारी रोजी स्ट्रोकमुळे गंभीर अवस्थेत न्यूरॉलॉजी वॉर्डच्या एचडीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दास यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडिया हँडल एक्सवर पोस्ट करत लिहिले आहे की, ‘परम रामभक्त, श्री राम जन्मभूमी मंदिर, श्री अयोध्या धामचे मुख्य पुजारी आचार्य श्री सत्येंद्र कुमार दासजी महाराज यांचे निधन अत्यंत दु:खद आणि आध्यात्मिक जगाची कधीही भरून न येणारी हानी आहे. विनम्र श्रद्धांजली!’
६ डिसेंबर १९९२ रोजी जेव्हा बाबरी मशीद पाडण्यात आली, तेव्हा दास तात्पुरत्या राम मंदिराचे पुजारी होते. राम मंदिराचे सर्वांत जास्त काळ सेवा करणारे मुख्य पुजारी दास यांनी वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी आध्यात्मिक जीवन स्वीकारले होते. अयोध्या आणि अगदी बाहेरही त्यांचा खूप आदर केला जातो.
निर्वाणी आखाड्याशी संबंधित असलेले दास हे अयोध्येतील सर्वांत सुलभ संतांपैकी एक होते आणि अयोध्या व राम मंदिराच्या घडामोडींबद्दल माहिती घेऊ इच्छिणा-या देशभरातील अनेक पत्रकारांसाठी ते सहज उपलब्ध असत. ६ डिसेंबर १९९२ रोजी जेव्हा बाबरी मशीद पाडण्यात आली, तेव्हा त्यांना मुख्य पुजारी म्हणून काम करून जेमतेम नऊ महिने झाले होते. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथापालथ झाली, ज्यामुळे भारतीय राजकारणाची दिशा बदलली. दास यांनी राम मंदिर आंदोलन आणि पुढील वाटचालीवर मीडियाच्या सर्व प्रश्नांची नेहमीच संयमाने उत्तरे दिली. विध्वंसानंतरही दास मुख्य पुजारी म्हणून राहिले आणि जेव्हा रामलल्लाची मूर्ती एका तात्पुरत्या तंबूखाली स्थापन करण्यात आली, तेव्हा त्यांनी पूजाही केली.