सोलापूर – फसवणूक केल्याच्या आरोपातून निवृत्त सहायक फौजदारासह चौघांची निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी दिला. जोहेब इक्बाल शेख, रजिया इक्बाल शेख, निवृत्त सहायक फौजदार इक्बाल गनी शेख (सर्व रा. दक्षिण सदर बझार) व याकूब रजबअल्ली शेख (रा. पुणे) अशी मुक्तता झालेल्या चौघांची नावे आहेत. फिर्यादीच्या मुलीचे लग्न जोहेब याच्याबरोबर २००९ मध्ये ठरले होते.
लग्नामध्ये मुलास ५ तोळे सोने, मुलीस ५ तोळे सोने, दोन लाख रुपये हुंडा, सूटकरिता ५० हजार रुपये व २ एकर – शेतजमीन देण्याची व दोन्ही अंगाने लग्न मुलीच्या वडिलाकडून करुन देण्याचे ठरले होते. मुलीचे वय कमी असल्याने त्यांचा साखरपुडा झाला. मुलीच्या वडिलांनी मानपान करुन साखरपुड्याचा मोठा कार्यक्रम केला. मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिचे आईवडील मुलाच्या घरी लग्नाची तारीख फिक्स करण्यासाठी गेले असता मुलाचे आईवडील व आरोपी याकूब यांनी लग्नात मुलीचे व मुलाचे अंगावर प्रत्येकी दहा तोळे सोने व पुणे येथे फ्लॅट घेऊन द्या व दीड लाखाचे साहित्य द्या तरच लग्न करणार असे सांगितले.
बरीच समजूत काढून फिर्यादी व त्यांचे पती घरी आले. त्यानंतर जोहेब शेख याने दुसऱ्या मुलीशी नोंदणीकृत लग्न केल्याचे फिर्यादीला समजले. त्यांची फसवणूक झाली म्हणून फिर्यादीने चौघांविरुध्द सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तपास पोलीस उपनिरीक्षक जी. एन. कदम यांनी तपास करुन न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने चारही आरोपींची निर्दो ष मुक्तता केली व जप्त मुद्देमाल आरोपींना परत करण्याचे आदेश दिले. यात आरोपींतर्फे अॅड. अहमद काझी, मोहम्मदअली काझी यांनी तर सरकारतर्फे अॅड. अमर डोके यांनी काम पाहिले.