मुंबई : प्रतिनिधी
नाशिक न्यायालयाने कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावल्याने त्यांची आमदारकी धोक्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशाची प्रत विधिमंडळ सचिवालयाला प्राप्त झाल्यावरच अपात्रतेच्या संदर्भात पुढील प्रक्रिया केली जाईल असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे काँग्रेस आमदार सुनील केदार यांना न्यायालयाने शिक्षा देताच लगेच दुस-या दिवशी विधिमंडळ सचिवालयाने अपात्रतेची कारवाई केली होती.
बनावट कागदपत्रे देऊन शासकीय सदनिका लाटल्याच्या प्रकरणात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ शिक्षा झाल्यास सदस्य त्या तारखेपासून अपात्र ठरतो, अशी स्पष्ट तरतूद आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने स्थगिती दिली नसेल तर विधिमंडळ सचिवालय लगेच अपात्रतेची कारवाई केली जाते. सुनील केदार यांना नागपूर बँक घोटाळ्यात न्यायालयाने २२ डिसेंबर २०२३ रोजी पाच वर्षांची शिक्षा ठोठावली.
लगेचच दुस-या दिवशी म्हणजे २३ डिसेंबरला केदार यांना अपात्र ठरविण्यात आले होते. राहुल गांधी यांनाही निकालाच्या दुस-या दिवशी लोकसभा अध्यक्षांनी निलंबित केले होते. पण न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतरच माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई होणार आहे.