20 C
Latur
Sunday, December 1, 2024
Homeधाराशिवधाराशिव येथे वृध्द दांपत्याला लुटणारी टोळी गजाआड

धाराशिव येथे वृध्द दांपत्याला लुटणारी टोळी गजाआड

धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव तालुक्यातील अंबेहोळ येथील वृद्ध दांपत्याला मारहाण करून त्यांच्या जवळील रोख रक्कम व सोन्याचे दागिने लुटणारी टोळी पोलिसांनी गजाआड केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा व धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबेहोळ येथील चाँद शाहाबुद्दीन शेख (वय ६५) हे दि. २३ जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास पत्नीसह धाराशिव येथून अंबेहोळ गावाकडे दुचाकीवरून जात होते. त्यावेळी धाराशिव शहरातील हॉटेल बालाघाटच्या पुढे दुचाकीवरून आलेल्या तीघांनी त्यांची दुचाकी अडविली. त्या दांपत्याला दुचाकीवरून खाली पाडून वृध्द महिलेच्या हातावर चाकुने वार केले. चाँद शेख यांना लाथाबुक्यांनी मारहाण करुन, त्यांना चाकुचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोख रक्कम १५ हजार रूपये जबरदस्तीने हिसकावून घेतली. नंतर ते तीघे फरार झाले होते. या प्रकरणी चाँद शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरुन धाराशिव शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा हा अत्यंत क्लिष्ठ व गंभीर स्वरुपाचा असल्याने व कुठलाही पुरावा उपलब्ध नसताना स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलीसांनी संयुक्तरित्या गुन्ह्याचा तपास केला. अत्यंत चिकाटीने, कौशल्यपुर्ण तसेच तांत्रिक विश्लेषणावरुन दि. ८ ऑगस्ट रोजी आरोपी दिनेश नागनाथ काळे (वय २०) रा. मोहा ता. कळंब ह.मु. कुरणे नगर धाराशिव, काका शंकर शिंदे, वय २१ रा. पिंपळगाव (क) ता. वाशी या दोघांना पोलिसांनी कुरणे नगर येथुन ताब्यात घेतले. सदर गुन्ह्यासंदर्भात त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी तीघांनी मिळून वृद्ध दांपत्याला लुटल्याची कबुली दिली. पोलिसांनी गुन्हा करताना वापरलेली होंडा सीबी शाईन दुचाकी, लुटमार केलेले रोख १५ हजार रूपये, सोन्याचे ९ ग्रॅम वजनाचे दागिने असा एकूण १ लाख १२ हजार रूपये किंमतीचा माल हस्तगत करण्यात आला. दोन्ही आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी धाराशिव शहर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिले.

ही कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक शकील शेख, सपोनि अमोल मोरे, सचिन खटके, पोलिस हावलदार विनोद जानराव, हुसेन सय्यद, प्रदीप वाघमारे, शैला टेळे, पोलिस नाईक नितीन जाधवर, बबन जाधवर, रवींद्र आरसेवाड, पोलिस अमंलदार सुनिल मोरे, प्रशांत किवंडे, प्रकाश बोईनवाड, पोलिस उपनिरीक्षक संदीप ओहोळ, पोलिस हावलदार अमोल मंगरुळे यांच्या पथकाने केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR