पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील दत्तात्रय महादेव जाधव यांच्या शेती गटनंबर ४५१ मध्ये दूध भेसळीसाठी वापरण्यात येत असलेल्या पाम ऑईलसह १७ लाख ६ हजार रुपये किमतीचा कच्चा माल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ही कारवाई करकंब पोलिस ठाणे व अन्न व औषध प्रशासन विभागाने केली.
याप्रकरणी साठा मालक दत्तात्रय महादेव जाधव, अनिकेत बबन कोरके (रा. सुगाव भोसे, ता पंढरपूर), सचिन अरुण फाळके (रा. पांढरेवाडी, ता पंढरपूर) यांच्यावर करकंब पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. भोसे येथे दूध भेसळ सुरू असल्याची माहिती करकंब पोलिस ठाण्याचे सपोनि सागर कुंजीर यांना मिळाली होती. त्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे दत्तात्रय जाधव यांच्या घरी छापा टाकला. ही कारवाई सपोनि सागर कुंजीर, अन्न व औषध प्रशासन सह. उपायुक्त सुनील जिंतूरकर, उमेश भुसे, चन्नवीर स्वामी, मंगेश लवटे, श्रीशैल हिटनळी, बापू मोरे, बालाजी घोळवे, विजय गोरवे, पाटेकर, सुर्वे यांनी केली आहे.