40.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रमतदानासाठी खासगी कार्यालयांनी कर्मचा-यांना भरपगारी सुटी न दिल्यास कारवाई

मतदानासाठी खासगी कार्यालयांनी कर्मचा-यांना भरपगारी सुटी न दिल्यास कारवाई

मुंबई : मुंबईत होणा-या मतदानासाठी जर खासगी कंपनीने सुटी न दिल्यास किंवा परवानगी घेऊन मतदानासाठी दोन तासांची सवलत न दिल्यास संबंधित कंपनीवर कारवाई करण्यात येणार आहे. मतदानाकरता मुंबई उपनगर जिल्ह्यातील उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या आणि संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांवरील कर्मचा-यांना भरपगारी सुटी अथवा सवलत न दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबधित आस्थापनांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक करता मुंबई उपनगर जिल्ह्यात समाविष्ट लोकसभा मतदारसंघात २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. मुंबई उपनगर जिल्हा कार्यक्षेत्रात मतदार असलेले, मात्र कामानिमित्त निवडणूक होणा-या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्या सर्व चाकरमान्यांना मतदान करता यावे यासाठी भरपगारी सुटी अथवा दोन तासांची सवलत देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या आस्थापनांना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल अशा आस्थापनांनी दोन तासांची सवलत मतदारांना द्यावी. मात्र त्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक राहील. मुंबई उपनगर जिल्ह्यात मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जिल्हाधिका-यांनी परिपत्रक काढून ही सूचना दिली आहे.

पुण्यातील तीन मतदारसंघात सुटी जाहीर
मतदानादिवशी पुणे जिल्ह्यातील सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांना सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. बारामती लोकसभा मतदार संघात ७ मे रोजी तर मावळ, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदार संघात १३ मे रोजी मतदान होणार असल्याने आहे. त्यामुळे त्या-त्या दिवशी मतदारसंघात सुटी असणार आहे. राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार, ही सार्वजनिक सुट्टी संबंधित मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी मतदारसंघांच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू असणार आहे. तसेच राज्य आणि केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम व इतर संस्था (प्रतिष्ठान) आदींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील. या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR