32.8 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeउद्योगसोने @७१,००० रुपये

सोने @७१,००० रुपये

सोन्याची खरेदी ‘सुवर्ण स्वप्न’

नवी दिल्ली/ मुंबई : सोन्याची झळाळी ७० हजार पार झाली आहे. सोन्याचे वाढते दर गुंतवणूकदारांना खुश करीत असतात. मात्र, ज्यांना लग्नसराईनिमित्त सोने खरेदी करायचे असते, त्यांना मात्र डोकेदुखीचा विषय ठरतो. ऐन लग्नसराईतच का वाढतो सोन्याचा दर? का लग्न आहेत म्हणून सुवर्णकार मंडळी वाढवतात भाव? असे एक ना अनेक प्रश्न सोने खरेदीदारांना पडत आहेत.

सोन्याचा भाव आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रती औंस अमेरिकन डॉलरमध्ये ठरतो. जगभरात सोन्याचे एकूण उत्पादन आणि मागणीवर हा दर ठरतो. भारतीय सणवार आणि लग्नसराई याचा भावाशी संबंध नाही. मात्र भारतीय ग्राहकांना वाटते की सोनारानेच हंगामात दर वाढवले आहेत. मात्र तसे नसते. भारतीय रुपयाचे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत अवमूल्यन झाले. सोप्या शब्दात डॉलर महाग झाला. सोन्याचा दर अमेरिकन डॉलरमध्ये ठरत असल्याने गेल्या दहा वर्षांत आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रती औंस डॉलरमध्ये बरीच वाढ झाली. भरीस भर याच दहा वर्षांत भारतीय रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत घटल्याने प्रति औंस सोन्याचा दर भारतात मोठ्या प्रमाणात वाढला.

एकूणच इतिहास पाहता भारतात सोन्याचा भाव हा दिवसागणिक वाढतच गेला आहे. दरम्यान आता सोने डिजिटल स्वरूपात खरेदी करता येते. कधीही, केव्हाही. विकता येते कधीही, केव्हाही. पूर्वी गुरुपुष्य योगावर मुहूर्त साधत एक-एक ग्रॅम सोने खरेदी केले जायचे. बँकेत लॉकरमध्ये ठेवून जेव्हा गरज असेल तेव्हा दागिने करणे किंवा विकणे, असे होत असायचे. आताही होते. सोने सांभाळायची जोखीम लक्षात घेता पेपर गोल्ड या संकल्पनेतूनही हे करता येते. जेव्हाचे तेव्हा पाहू, असा विचार केल्यास सोने महागच मिळणार.

सोने गुंतवणूक की भ्रम?
सोने हा एक मौल्यवान धातू आहे. उत्पादन कमी आणि मागणी जास्त असल्याने भाव वाढतच राहणार. प्रत्येक महिन्यात थोडेथोडे खरेदी केले तर भविष्यात ग्रॅम-ग्रॅम साठून अनेक तोळे साठेल. गुंतवणूक म्हणून किंवा लग्नात आवश्यक म्हणून नक्कीच उपयोगी पडेल. दरम्यान सोन्यात गुंतवणूक करावी की गुंतवणूक केवळ एकप्रकारचा भ्रम आहे हे कोडे सुटता सुटेना. सोने समजा ७०००० हजार रुपये १० ग्रॅम असेल तर त्यावर ३ टक्के जीएसटी म्हणजे २१०० रुपये हे मिळून ७२१०० रुपये जीएसटीसह १० ग्रॅम तर यावर असणारी किमान मजुरी ही ६ टक्के म्हणजे ४३२६ रुपये एवढे हे सर्व मिळून ग्राहकांना १० ग्रॅम सोने ७६४२६ रुपयांना मिळते. तर विक्री करायला गेले तेव्हा जीएसटी आणि मजुरी कापून तथा विक्रीचा भाव असे करून हजारो रुपयांचे नुकसान होते. यामुळे सोने खरेदी करावे की नको हा भ्रम आहे.

डॉलर आणि रुपयाचे मूल्य महत्त्वाचे
भारतातील सोन्याचा भाव हा डॉलर आणि रुपया याच्या विनिमयाचा दर यावर अवलंबून असतो. १ एप्रिल २०१४ रोजी सोन्याचा भाव १,३०० डॉलर प्रती औंस इतका होता. भारतात २९ हजार रुपये प्रती तोळा. १ एप्रिल २०२४ रोजी हाच भाव २,२६० डॉलर प्रती औंस इतका झाला. यामुळे भारतात रुपयांमध्ये भाव ६९,००० रुपये प्रती तोळा इतका झाला.

दहा वर्षांत डॉलर २५.२२ रुपयांनी वाढला
केवळ दहा वर्षांत डॉलरच्या तुलनेत सोन्याच्या भावात
७४% वाढ झाली आहे. दर भारतीय बाजारात हाच भाव १४० टक्क्यांनी वाढला आहे. याचे एकमात्र कारण म्हणजे २०१४ साली एका डॉलरला भारतीय ५९.३३ रुपये मोजावे लागायचे आणि आता दहा वर्षांनंतर त्याच एका डॉलरला ८४.५५ रुपये मोजावे लागतात. तुलनेने आज डॉलरमध्ये २५.२२ रुपयांची प्रचंड मोठी वाढ झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR