सोलापूर : ‘टीईटी’ परीक्षेच्या घोटाळ्यात सहभागी असल्याचा ठपका ठेवून प्राथमिक शिक्षण विभागाकडील पाच शिक्षण सेवकांवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सेवा समाप्तीची कारवाई केली आहे.
२०१८ व २०१९ मध्ये महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेत घोटाळा झाला. शिक्षणसेवक पद मिळविण्यासाठी परीक्षेत प्रत्यक्ष मिळालेल्या गुणांऐवजी अधिक गुण दर्शविण्यात आले. या प्रकरणी पुणे शहर सायबर पोलिस ठाण्यात सात हजार ८७४ उमेदवारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तसेच शिक्षण आयुक्तांच्या १४ ऑक्टोबर २०२२ व ३ ऑगस्ट २०२३ च्या आदेशानुसार या गैरप्रकारातील उमेदवारांची परीक्षेतील संपादणूक रद्द केली आहे. तसेच त्यापुढील काळात घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी त्यांच्यावर कायमस्वरुपी बंदी घातली आहे.
तरीही या पाच शिक्षण सेवकांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने ७ मार्च २०१४ रोजी कागपत्रे पडताळणीसाठी बोलावल्यावर हजेरी लावली. तसेच तपासणीवेळी आपण कोणत्याही गैरप्रकारात सहभागी नसल्याचे आणि दिलेली कागदपत्रे खरी असल्याचे स्वयंघोषणापत्र दिले. ती चुकीची आढळल्यास कारवाईस पात्र असल्याचेही त्यांनी त्यात नमूद केले. जिल्हा परिषदेने त्यांना २६ जुलै २०२४ रोजी शिक्षण सेवकपदी नियुक्तीचा आदेश दिला.
जिल्हा परिषदेने केलेल्या कागदपत्रांच्या पडताळणीत पुण्याच्या सायबर पोलिसांत दाखल गुन्ह्यातील संशयितांत या पाच शिक्षणसेवकांचा समावेश असल्याचे उघड झाले. त्यानंतर त्यांनी खोटी व बनावट कागदपत्रे सादर करुन शिक्षण सेवकपदी नियुक्ती मिळविल्याचा ठपका ठेवून मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी त्यांच्यावर सेवामुक्तीची कारवाई केली आहे.
शिक्षक पात्रता परीक्षेतील घोटाळ्यातील सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामध्ये कार्यरत असलेल्या शिक्षण सेवकांनी बनावट व खोटी कागदपत्रे सादर करून नोकरी मिळवली होती. त्यांचे विरुद्ध टीईटी २०१९ परीक्षा घोटाळ्याचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चौकशीनंतर मुख्य कार्यकारी अधिकरी कुलदीप जंगम यांनी त्या पाच शिक्षण सेवकावर सेवामुक्तीची कारवाई केल्याचा आदेश काढला आहे. या पाचही शिक्षण सेवकांनी जिल्हा परिषदेला खोटी व बनावट कागदपत्रे सादर करुन शिक्षण सेवकपदी नियुक्ती मिळविल्याचे तपासणीत उघड झाले आहे. शिवाय टीईटी गैरप्रकारप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. त्यांची सेवासमाप्ती केली आहे. मात्र, याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी कारवाई होणार का, या प्रश्नावर शिक्षण प्रशासनाने मौन बाळगले.
दिलीप भोये काळेवाडी, ता. सांगोला ,कांतीलाल बहीराम गावडे गायकरवस्ती, ता. सांगोला ,परशुराम वाकडे कोळेकरवाडी, ता. सांगोला ,प्रियदर्शिनी भिसे पेहे, ता. पंढरपूर,उर्मिला गंभीरे भिवरवाडी, ता. करमाळा अशी शिक्षणसेवीकांची नावे आहेत.