मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ तब्बल १४ हजार पुरूषांनी घेतल्याचे समोर आले आहे. या योजनेच्या संदर्भात आम्ही राज्य तसेच केंद्र सरकारच्या विविध विभागांकडून आकडेवारी गोळा करत आहोत. या आकडेवारीची अगदी स्थानिक पातळीवर काटेकोर छानणी करण्यात येत आहे. जे अपात्र लाभार्थी असतील त्यांच्यावर निश्चितच कारवाई करून रिकव्हरी केली जाईल, असे महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. लाभार्थ्यांची छानणी ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. चुकीच्या लाभार्थ्यांना लाभ मिळू नये यासाठी शासन कटिबध्द आहे तसेच सामाजिक न्याय किंवा इतर कोणत्याही विभागाचा निधी वळवून लाडकी बहीण योजनेला देण्यात आलेला नसल्याचेही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.
ही योजना सातत्याने विरोधकांच्या डोळ्यात खुपत आली आहे. सातत्याने गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होतो असल्याचे सांगून आदिती तटकरे म्हणाल्या, २८ जून २०२४ ला या योजनेला सुरुवात झाली. २ कोटी ६३ लाख महिलांनी नोंदणी केली होती त्यापैकी २ कोटी ४७ लाख महिलांना लाभ देतोय. याचाच अर्थ छानणी करण्यात आली आहे तसेच सर्व विभागांची आकडेवारी आमच्याकडे नसते. ती ज्या पध्दतीने येते त्यानुसार छानणी करण्यात येते. जानेवारी महिन्यात कृषी विभागाची आकडेवारी आली. त्याची महिनाभर छानणी करण्यात आली.
नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणा-या महिलांना त्यातून १ हजार तर लाडकी बहीणमधून ५०० अशा प्रकारे दीड हजारांचा लाभ देण्यात आला. आता १४ हजार पुरूषांची आकडेवारी समोर आली आहे. आता त्यांनी हे मुद्दामहून केले की, घरातील महिलेचे बँक खाते नसल्याने त्यांनी त्यांचे खाते दिले हे तपासून पाहण्यात येणार आहे. ज्या सरकारी कर्मचा-यांनी या योजनेचा लाभ घेतला त्यांच्यावरही कार्यवाही करण्यात आली आहे.
सध्या जी आकडेवारी आमच्याकडे नव्याने आली आहे ती मोघम स्वरूपाची आहे. आमच्याकडून स्थानिक पातळीवर त्याची काटेकोर छानणी करण्यात येईल, असे आदिती तटकरे यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या आयकर विभागाकडूनही आकडेवारी मागण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
















