मुंबई : मीरा भाईंदर विधानसभा निवडणुकीसाठी चुरशीचे मतदान होत आहे. या ठिकाणी महायुती विरुद्ध अपक्ष उमेदवारात हायहोल्टेज लढत होत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी सात वाजता मतदानास सुरुवात झाली. याठिकाणी सकाळपासून मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली मात्र दुपारी भाजप उमेदवार नरेंद्र मेहता यांचे स्वीय सहाय्यक, कार्यकर्ते आणि अपक्ष उमेदवार गीता जैन यांचे समर्थक भिडले.
मीरा भाईंदर पश्चिमेच्या अहिंसा चौकात भाजप उमेदवार नरेंद्र मेहता यांचे स्वीय सहाय्यक, कार्यकर्ते आणि अपक्ष उमेदवार गीता जैन यांचे समर्थक समोरासमोर आले. त्यामुळे काहीकाळ तणावपूर्ण वातावरण पहावयास मिळाले. या घटनेची माहिती समजताच घटनास्थळी नरेंद्र मेहता पोहोचले आणि वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.
सध्या या ठिकाणचे वातावरण शांत असून कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी जास्तीच जास्त प्रमाणात खाली उतरून मतदान करावे, बाकी लक्ष देऊ नये, असे आव्हान नरेंद्र मेहता यांनी केले. या प्रकारानंतर या ठिकाणचा पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.