24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमनोरंजनअभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन

अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन

मुंबई – आपल्या अनोख्या अभिनय शैलीने मराठी-हिंदी रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण करणा-या अभिनेते रवींद्र बेर्डे (७८) यांचे निधन झाले आहे. मागील ब-याच वर्षांपासून ते घशाच्या कर्करोगाने त्रस्त होते. काही महिन्यांपासून टाटा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. दोन दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते. अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

 

रवींद्र हे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे बंधू होते. लक्ष्मीकांत यांच्यासोबत त्यांनी ब-याच सुपरहिट चित्रपटांत काम केले आहे. वयाच्या विसाव्या वर्षी नभोवाणीशी आणि १९६५ च्या काळात नाट्यसृष्टीशी रवींद्र यांची नाळ जोडली गेली. चंगू मंगू, धमाल बाबल्या गणप्याची, एक गाडी बाकी अनाडी, हाच सुनबाईचा भाऊ, खतरनाक, अष्टरूप जय वैभवलक्ष्मी माता, होऊन जाऊदे, हमाल दे धमाल, थरथराट, उचला रे उचला, बकाल, धडाकेबाज, गंमत जंमत, झपाटलेला, भुताची शाळा अशा गाजलेल्या मराठी सिनेमांसोबत त्यांनी ‘सिंघम’सारख्या सुपरहिट हिंदी सिनेमातही अभिनय केला आहे.

३०० हून अधिक मराठी चित्रपट आणि जवळपास ५ हिंदी चित्रपटांतून त्यांनी काम केले होते. १९९५ मध्ये ‘व्यक्ती आणि वल्ली’ नाटकावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन गेला. त्यानंतर २०११ पासून ते कर्करोगाशी झुंज देत होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR