जोगुलांबा : दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा हा एका भीषण रस्ते अपघातातून थोडक्यात बचावला आहे. ही दुर्घटना तेलंगाणामधील जोगुलांबा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर घडली. अभिनेता विजय देवरकोंडा याची कार या महामार्गावरून जात असताना मागून आलेल्या एका गाडीने त्याच्या कारला धडक दिली. या अपघातात विजय याच्या कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने एवढा मोठा अपघात होऊनही विजय देवरकोंडा सुखरूप बचावला आहे.
अपघात झाल्यानंतर विजय देवरकोंडा याच्या ड्रायव्हरने स्थानिक पोलिसांना त्वरित माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. या अपघाताबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, तेलुगू अभिनेता विजय देवरकोंडा हा त्याच्या कारमधून पुट्टपर्थी येथून हैदराबाद येथे जात असताना जोगुलम्बा गडवाल जिल्ह्यातील उंडावल्ली येथे त्याच्या कारला दुस-या वाहनाची धडक बसली. हा अपघात दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास झाला. या धडकेत विजय देवरकोंडा याच्या कारचे नुकसान झाले आहे. मात्र या अपघातात कुठलीही जीवित हानी झालेली नाही.