मुंबई : धारावी पुनर्विकास योजनेच्या विरोधात शिवसेनेच्या (ठाकरे गट) वतीने शनिवारी भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार आणि गौतम अदानी यांच्यावर जोरदार टीकास्र सोडले. राज्यातील सरकार अदानींच्या दारी आहे. धारावीतील सर्व गोष्टींचा टीडीआर अदानींना देऊन टाकला आहे. ‘सब भूमी अदानी की’ होऊ देणार नाही, असे ठाकरे म्हणाले.
शिवसेनेत बंड झाल्यानंतर आणि राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर तेंव्हा खोके कुणी पुरवले होते, हे आता लक्षात आल्याचे सांगत उद्धव ठाकरेंनी थेट निशाणा साधला. अडीच वर्ष यशस्वीपणे चालणारे सरकार गद्दारी करुन कुणी पाडले हे तुमच्या लक्षात आलेले असेल. गुवाहाटीला जाण्यासाठी विमाने कुणी पुरवली असतील, हे लक्षात आलेले असेल. उद्धव ठाकरे सत्तेवर आहेत तोपर्यंत मुंबई गिळता येणार हे लक्षात आल्याने सरकार पाडल की काय असे वाटू लागले आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
अदानींना धारावी, विमानतळ, नवी मुंबईतील विमानतळ, रेक्लेमेशन अदानींना दिले जात आहे. कोरोनाशी लढून जिंकणारी धारावी अदानीला शरण जाईल का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. आता पन्नास-पंचावन्न हजार लोकांना अपात्र ठरवले आहे. नंतर लाखांच्या पुढे अपात्र ठरवण्यात येईल. सगळे अदानींच्या घशात घालून काय होणार? केवळ तीनशे स्क्वेअर फूटच घर का? पाचशे स्क्वेअर फूट घर मिळाले पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.