मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या बैठका, सभा सुरू आहेत. दरम्यान, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली.
आदिती तटकरे यांनी ट्विट करून आवाहन केले आहे, आपल्या पोस्टमध्ये तटकरेंनी म्हटले आहे की, माझं फेसबुक अकाऊंट काही अज्ञात व्यक्तींकडून हॅक करण्यात आले असून त्यावरून काही आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला जात आहे. अशा पोस्टवर कृपया आपण व्यक्त होऊ नये, ही नम्र विनंती, असे आवाहन तटकरे यांनी केले आहे. याबाबत मी पोलिसांत रीतसर तक्रार दाखल केली असून लवकरच या हॅकर्सचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.