नागपूर : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या अडचणी येत्या काळात वाढणार असल्याचे बोलले जात आहे. दिशा सालियान प्रकरणी राज्य सरकार आदित्य ठाकरेंची एसआयटी चौकशी करणार आहे. तसेच, एसआयटीसंदर्भात आजच ऑर्डर येण्याची शक्यता आहे. सुजाता सौनिक आज एसआयटी संदर्भात ऑर्डर काढू शकतात, अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, अतिरिक्त पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वात एसआयटी पथक काम करणार आहे.
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी सातत्याने काही आमदार करत होते. त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात या प्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते.
दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणी नेमके आदित्य ठाकरे त्यावेळी कुठे होते? असा प्रश्न अनेक आमदारांकडून सातत्याने उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या चौकशीत अनेक पुरावे समोर येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दिशा सालियान मृत्यू प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. विरोधकांकडून सातत्याने आदित्य ठाकरेंवर याप्रकरणी आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. भाजप आमदार नितेश राणे याप्रकरणी आदित्य ठाकरेंवर वारंवार थेट आरोप करत होते. त्यामुळे या प्रकरणाला संशियत वळण मिळालेले आहे. त्यानंतर आता या प्रकरणाची चौकशी थेट एसआटीमार्फत केली जाणार आहे. दरम्यान, डिसेंबर २०२२ मध्ये उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियान प्रकरणी एसआयटी चौकशीची घोषणा केली होती.