मुंबई : राज्यातील विधानसभेचे हिवाळी अधिवेशन वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे गाजत आहे. या अधिवेशनात दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूचे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. दिशा सालियन प्रकरणामध्ये माजी मंत्री आदित्य ठाकरेंची एसआयटी मार्फत चौकशी होणार असल्याचे निश्चित झाले आहे. याप्रकरणाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरेंची पाठराखण केली आहे. या प्रकरणाबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. दिशा सालियन प्रकरणामध्ये कुटुंब म्हणून शर्मिला ठाकरे या आदित्य ठाकरेंच्या पाठिशी उभे असल्याचे दिसत आहे.
दिशा सालियन प्रकरणासंदर्भात एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकरणाकडे कसे पाहता, असा प्रश्न पत्रकारांनी शर्मिला ठाकरेंना विचारला. हा प्रश्न ऐकताच क्षणाचाही विलंब न लावता शर्मिता ठाकरेंनी, आदित्य असे काही करेल असे मला वाटत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली. पुढे बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, चौकश्या काहीही लावू शकतात. आम्ही पण याच्यातून खूपदा गेलो आहोत, असे त्या म्हणाल्या.