पुणे : प्रतिनिधी
पिवळा भंडारा जेजुरी गडावर आणि जेजुरी नगरीत एवढा उधळला जातो की, या भांडा-यामुळे जेजुरीनगरी अक्षरश: सोन्यासारखी पिवळी होते, आणि म्हणूनच जेजुरीला सोन्याची जेजुरी देखील म्हटले जाते. मात्र, हाच पिवळा भंडारा आता जेजुरीला येणा-या भाविकांच्या आणि स्थानिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतोय. या भंडा-यामध्ये होत असलेल्या भेसळीमुळे भाविकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
दरम्यान, अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी नगरीला सोन्याची जेजुरी म्हणून ओळखले जाते, ते म्हणजे जेजुरीमध्ये उधळल्या जाणा-या पिवळ्या भंडा-यामुळे. ऐतिहासिक अशा जेजुरीच्या गडाला देखील यापासून धोका निर्माण होतोय. त्यामुळे या भंडा-यात होणारी भेसळ रोखावी, अशी मागणी जेजुरी येथील मार्तंड देवसंस्थानचे माजी मुख्य विश्वस्त शिवराज झगडे यांनी केली आहे. याबाबतचे एक निवेदन त्यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांना दिले आहे, आणि ही भेसळ थांबण्यासाठी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या सोनपिवळ्या भंडा-यामुळेच ‘सोन्याची जेजुरी’ हे नाव प्रचलित झाले आहे. मंगलकार्यात हळद ही भाग्याची तर कुंकू सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या भंडा-याला भेसळीचे ग्रहण लागले आहे. ‘यलो पावडर’ म्हणजेच ‘नॉन ईडीबल’ टर्मरीक पावडर या नावाने येथे भेसळयुक्त भंडारा विकला जात आहे. यात्रा-उत्सव काळात मोठ्या प्रमाणावर याची विक्री होते. या भंडा-यामुळे त्वचेची आग होणे, डोळे चुरचुरणे, त्वचेवर काळे डाग पडणे या समस्या जाणवत आहेत.
सर्वांत गंभीर बाब म्हणजे भेसळयुक्त भंडा-याच्या उधळणीमुळे जेजुरी गडाच्या ऐतिहासिक दगडांवर परिणाम होत असल्याचा अहवाल, मागील काळात पुरातत्व खात्याने दिला असून त्यावर निर्बंध घालण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.