मुंबई : दुधात भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग अधिक सक्रिय झाला असून येणा-या काळात यासंबंधी कारवाईला आणखी वेग येणार असल्याचे दिसत आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वात एफडीए अत्यंत सुनियोजित व धडाकेबाज कारवाई करत असून दूधभेसळ रोखण्यासाठी योग्य ती पावले उचलत आहे. १५ जानेवारी २०२५ रोजी दूध सर्वेक्षण मोहिमेमध्ये अप्रमाणित घोषित करण्यात आलेल्या दुधाच्या नमुन्यांबाबत संबंधित सहाय्यक आयुक्त (अन्न) आणि संबंधित अधिका-यांना तत्काळ आणि कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
१५ जानेवारी २०२५ रोजी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या आदेशाने पहाटेपासून राज्यभरातील दूध उत्पादक, वितरक, विक्रेते व रस्त्यावरील विक्री केंद्रांवर अन्नसुरक्षा अधिर्कायांनी राज्यव्यापी तपासणी मोहिम बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती अशा ठिकाणी राबवली. यामध्ये विविध ब्रँडच्या पिशवीबंद/पॅकबंद दुधाचे ६९८ नमुने आणि सुटया स्वरुपातील दूधाचे ३९७ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले होते. म्हणजेच दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या एकूण १०९५ नमुन्यांचे अन्नसुरक्षा व मानके प्राधिकृत प्रयोगशाळांमधून विश्लेषण करण्यात आले. यापैकी १३३ नमुने मानकाप्रमाणे नसल्याचे आढळून आले होते.
याबाबत पुढील कारवाई करण्याचे निर्देश संबंधित अधिका-यांना देण्यात आले आहेत.
केंद्रीय परवाना आस्थापना व राज्य परवाना आस्थापना मधील नमुने अप्रमाणित घोषित झाले होते, त्या संदर्भात अन्न सुरक्षा अधिका-यांनी उत्पादकांकडे नियमित नमुने घेऊन व विश्लेषण अहवालांच्या अनुषंगाने भेसळकारी पदार्थांबाबत आस्थापनेची सखोल तपासणी करुन भेसळ कोणत्या स्तरावर झाली याबाबत संपूर्ण तपास, चौकशी करण्याचे व अशा आस्थापनांवर तसेच पुरवठादारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत. तसेच भेसळ थांबवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.