लखनौ : केंद्र सरकारने अलाहाबाद न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाला प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांना गुटखा कंपन्यांच्या जाहिरातींबद्दल नोटीस जारी केल्याची माहिती देऊन अवमान याचिकेला उत्तर दिले आहे. अवमान याचिकेला उत्तर देताना डेप्युटी सॉलिसिटर जनरल एसबी पांडे यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाला माहिती दिली की केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणने अभिनेता शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांना २० ऑक्टोबर रोजी गुटखा कंपन्यांच्या जाहारीतीबद्दल नोटीस बजावली होती.
वकील मोतीलाल यादव यांनी एक याचिका दाखल केली होती. ज्यात प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या विशेषत: पद्म पुरस्कार विजेत्यांचे काही ठराविक उत्पादनांना समर्थन अथवा मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक आरोग्यास हानीकारक असलेल्या वस्तूंच्या जाहिरातींबाबत गंभीर मुद्दे उपस्थित केले होते. न्यायालयाने ऑगस्ट २०२३ मध्ये कॅबिनेट सचिव, मुख्य आयुक्त आणि केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण यांना नोटीस बजावली होती. सप्टेंबर २०२२ च्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल अवमानना कारवाई करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती.
त्यावर याचिकाकर्त्याला भारत सरकारकडे जाण्यास सांगितले होते. नोटीसला उत्तर देताना डेप्युटी सॉलिसिटर जनरल एसबी पांडे यांनी न्यायमूर्ती राजेश सिंह चौहान यांच्या खंडपीठासमोर सांगितले की, अभिनेता शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांना २० ऑक्टोबर रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. ते पुढे म्हणाले की, अमिताभ बच्चन यांनी करार रद्द झाला असतानाही त्यांची जाहिरात दाखविणा-या तंबाखू कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवली होती. या प्रकरणी न्यायालयाने पुढील सुनावणी ९ मे २०२४ रोजी ठेवली आहे.