22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रबीडमध्ये वंचितच्या उमेदवाराचे आरक्षणावर शपथपत्र

बीडमध्ये वंचितच्या उमेदवाराचे आरक्षणावर शपथपत्र

बीड : बीड लोकसभा मतदारसंघात यंदा चांगलीच चुरस वाढली असून निवडणुकीत जातीय रंग दिसून येत आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे केंद्रस्थान असल्याने बीड जिल्ह्यात मराठा समाजही निवडणूक प्रक्रियेत सक्रिय झाला आहे. बीडमध्ये पंकजा मुंडेंना महाविकास आघाडीच्या बजरंग सोनवणेंचे आव्हान असून वंचित बहुजन आघाडीनेही येथील मतदारसंघात उमेदवार दिला आहे.

त्यामुळे, येथील निवडणूक तिरंगी होत असली तरीही थेट लढत पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यातच असणार आहे. मात्र, बीडमध्ये जरांगे पॅटर्नही लक्षवेधी आहे. त्यातच, जरांगे यांनी मराठा आरक्षण देणा-या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. आता, वंचितच्या उमेदवाराने थेट स्टँप पेपरवरच आरक्षणाबाबत लिहून दिले आहे.

बीड लोकसभा निवडणुकीचा प्रचार आज अंतिम टप्प्यात आला असून सायंकाळी ६ वाजता येथील प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे, पंकजा मुंडेंसाठी आज स्वत: उदयनराजे भोसले व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची परळीत सभा पार पडली. तर, शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बजरंग सोनवणेंच्या प्रचारासाठी सभा होत आहे. त्यातच, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने नवा ट्विस्ट निर्माण केला आहे. वंचितच्या उमेदवाराने थेट बॉण्ड पेपरवरच आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करणारे शपथपत्र तयार केले असून ते प्रसिद्धही करण्यात आले. विशेष म्हणजे हे शपथपत्र मनोज जरांगे पाटील यांना सादर करण्यात येणार असल्याचेही उमेदवाराने स्पष्ट केले आहे.

बीड लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे यांनी मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाबाबतच्या आरक्षणाची हमी थेट बॉण्डवर लिहून जाहीर केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी जो उमेदवार आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करेल, त्याच्या पाठिशी मराठा समाज उभा राहील असे म्हटले होते. त्यानंतर आता वंचितचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांनी आपली भूमिका बॉण्डवर लिहून देत स्पष्ट केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR