नवी दिल्ली : अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात दोन्ही संघातील फलंदाजांचा जलवा पाहायला मिळाला. फलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर दोन्ही संघांनी कसोटी क्रिकेटमधील आपापल्या सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम नोंदवला. अफगाणिस्तानच्या संघाने तर ६९९ धावा करत पाकिस्तानच्या ६६ वर्षांपूर्वीच्या विक्रमाला सुरुंग लावल्याचेपाहायला मिळाले. दोन फलंदाजांच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानने कसोटी इतिहासात नवा कारनामा करुन दाखवला आहे.
झिम्बाब्वे विरुद्धच्या कसोटी मालिकेत अफगाणिस्तानच्या संघाने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच ६०० पेक्षा अधिक धावासंख्या उभारण्याचा पराक्रम करून दाखवला. अफगाणिस्तानने आपल्या दहाव्या कसोटी सामन्यात ही कमाल केली आहे. टीम इंडियाविरुद्ध २०१८ मध्ये अफगाणिस्तानच्या संघाने आपला पहिला कसोटी सामना खेळला होता. झिम्बाब्वे विरुद्धच्या कामगिरीसह सर्वांत कमी कसोटी सामन्यात ६०० पेक्षा अधिक धावा करण्याच्या खास विक्रमाला अफगाणिस्तानने गवसणी घातली. याआधी हा रेकॉर्ड पाकिस्तानच्या नावे होता.
पाकिस्तानच्या संघाने १९५२ पासून कसोटी खेळायला सरुवात केली. १९५८ मध्ये १९ व्या सामन्यात पाक संघानं पहिल्यांदा ६०० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. याबाबतीत अफगाणिस्तानच्या संघाने वेस्ट इंडिज संघालाही मागे टाकले आहे. कॅरेबियन संघाने २७ व्या कसोटी सामन्यात पहिल्यांदा ६०० धावसंख्येचा आकडा गाठला होता. झिम्बाब्वेच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना पहिल्या डावात ५८६ धावा केल्या होत्या. कसोटी क्रिकेटमधील ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या ठरली. संघाकडून सीन विलियम्स याने सर्वाधिक १५४ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय कर्णधार क्रेग इर्विन याने १०४ धावा आणि दुसरा कसोटी सामना खेळणा-या २१ वर्षीय ब्रायन बॅनेट याने नाबाद ११० धावांचे योगदान दिले. या धावसंख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या संघाने पहिल्या डावात ६९९ धावा केल्या. अफगाणिस्तानकडून रहमत शाह आणि हसमत उल्लाह शहिदी यांनी द्विशतके झळकावली. याशिवाय विकेट किपर बॅटर अफसर जजईच्या भात्यातून शतक आले. झिम्बाब्वेने आपल्या दुस-या डावात ३४ षटकात ४ बाद १४२ धावा केल्या. सरशेवटी हा सामना ड्रॉ झाला.