काबूल : वृत्तसंस्था
अफगाणिस्तान भूकंपाने पुन्हा हादरला आहे. नुकत्याच झालेल्या भूकंपाच्या धक्क्यातून सावरत असतानाच पुन्हा तिसरा धक्का बसला. गुरुवारी ४ सप्टेंबरला आग्नेय अफगाणिस्तानात ६.२ तीव्रतेचा भूकंप झाल्याचे वृत्त आहे. रविवारी अफगाणिस्तानात मोठा भूकंप झाला होता. त्यानंतर हा त्याच प्रदेशातील तिसरा भूकंप आहे. रविवारी झालेल्या भीषण भूकंपात २,२०० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत.
दरम्यान, आज झालेल्या भूकंपाची तीव्रताही मोठी आहे. कुनार आणि नांगरहार भागात झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर हा १० किमी खोलीवर तिसरा भूकंप झाला. यामध्ये हजारो लोक बेघर झाले तर ३६०० हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती आहे. अफगाणिस्तानातील भूकंपात घर धुळीस मिळाली आहेत. त्या ढिगा-यातून गुरुवारी बचाव पथकातील कर्मचा-यांनी मृतदेह बाहेर काढले. त्यामुळे मृतांचा आकडा २,२०० वर पोहोचला आहे तर वाचलेल्यांचे भविष्य अंधारमय झाले आहे. कारण जागतिक मदत संस्थांनी संसाधने कमी होण्याचा इशारा दिला आहे.
पूर्वेकडील डोंगराळ भागात भूकंपाचा मोठा हादरा बसला. तेथे अजूनही शोध मोहीम सुरूच आहे, असे तालिबान प्रशासनाने सांगितले. या भूकंपात २,२०० जणांचा मृत्यू झाला आहे तर किमान ३,६४० जण जखमी झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. कुनार प्रांतही भूकंपामुळे प्रभावित झाला.