बंगळूरू : न्यूझीलंडने बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या कसोटी सामन्यात भारताविरुद्ध ८ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडने भारत दौ-याची शानदार सुरुवात केली आहे. तसेच तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी देखील घेतली आहे.
न्यूझीलंडने ३६ वर्षांनंतर भारतात कसोटीत विजय मिळवला आहे. यापूर्वी १९८८ साली न्यूझीलंडने भारतात कसोटीत विजय मिळवला होता. पहिल्या दिवस पावसामुळे वाया गेल्यानंतर पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रात न्यूझीलंडने विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय बुमरँग झाला आणि भारताचा पहिला डाव अवघ्या ४६ धावांवर संपुष्टात आला. पावसामुळे जवळपास तीन दिवस खेळपट्टीवर कव्हर होते.
त्यामुळे खेळपट्टीत ओलावा होता. तसेच दुस-या दिवशी जेव्हा खेळ सुरू झाला होता, तेव्हा वातावरणही ढगाळ होते. अशात न्यूझीलंडच्या उंच असलेल्या वेगवान गोलंदाजांना मोठी मदत झाली. विल्यम ओरुर्कीने ४ आणि मॅट हेन्रीने ५ विकेट्स घेतल्या. दरम्यान, दुस-या दिवसाच्या खेळानंतर रोहितनेही निर्णय चुकल्याचे मान्य केले होते.