बारामती : बारामतीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राजकारणाला ब्रेक लावण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांअडून भाजपने मोठा डाव टाकला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती मतदारसंघात दररोज नवनवे राजकीय प्रयोग पाहायला मिळत आहेत. येथून खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद-भावजयच्या लढतीत अजित पवारांनी उमेदवारी अर्ज घेतला. त्यानंतर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनीही उमेदवारी अर्ज घेतला आहे. यामुळे या मतदारसंघात ट्विस्ट पे ट्विस्ट होत असल्याचे दिसून येत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पवार कुटुंबीयांनी शरद पवारांची साथ दिली आहे. अजितदादांचे बंधू श्रीनिवास पवार आणि पुतणे युगेंद्र हे सध्या सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात व्यस्त असतात. त्यामुळे बारामतीची लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. महायुतीच्या सुनेत्रा पवार आणि आघाडीच्या सुळे या 18 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तत्पुर्वीच अजित पवार यांच्यासह सुनंदा पवारांनीही उमेदवारी अर्ज घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
सुनेत्रा पवारांच्या अर्जात काही चूक झाली तर तो अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून अजित पवारांसह तीन उमेदवारी अर्ज घेतले होते. हीच खबदारी शरद पवार गटाकडूनही घेतल्याचे बोलले जात आहे. सुनंदा राजेंद्र पवार यांनीही निवडणूक निर्णय अधिका-याकडून बारामती लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज घेतला आहे. लक्ष्मीकांत खाबिया यांनी सुनंदा पवारांसाठी अर्ज घेतला.
पुणे जिल्ह्यातील पुणे, शिरूर, मावळ आणि बारामती या चार लोकसभा मतदारसंघांसाठी दोन टप्प्यांत निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यात बारामती लोकसभेसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठीची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ७ मे रोजी बारामतीसाठी, तर १३ मे रोजी पुणे, शिरूर आणि मावळसाठी मतदान होणार आहे.
त्यानुसार बारामती मतदारसंघासाठी १२ ते १९ एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत, तर २० एप्रिलला उमेदवारी अर्जांची छाननी होईल, आणि २२ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. महायुतीचे तिन्ही उमेदवार १८ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.