22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्र‘लाडकी बहीण’नंतर आता मुख्यमंत्र्यांची लाडक्या भावांसाठी खास योजनेची घोषणा

‘लाडकी बहीण’नंतर आता मुख्यमंत्र्यांची लाडक्या भावांसाठी खास योजनेची घोषणा

सोलापूर : प्रतिनिधी
राज्य सरकारने नुकतीच राज्यातील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरू केली असून या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या भावांसाठीही खास योजनेची घोषणा केली आहे.

जो तरुण बारावी उत्तीर्ण झाला असेल, त्याला दरमहा सहा हजार रुपये दिले जातील. तर डिप्लोमा केलेल्या तरुणाला आठ हजार रुपये मिळतील. तसेच पदवीधर तरुणाला १० हजार रुपये महिन्याला दिले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. या महापूजेनंतर त्यांनी भाषण केले. या भाषणावेळी त्यांनी ही घोषणा केली.

हा तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेन्टिसशिप करेल. त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल. एक प्रकारे आपण स्कील्ड मॅनपॉवर (कुशल कामगार) तयार करत आहोत. राज्यासह देशातील उद्योग जगताला कुशल तरुण पुरवणार आहोत. आपले तरुण त्यांच्या कामात कुशल व्हावेत, यासाठी सरकार पैसे भरणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला आता दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना आता ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. तसेच ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना ०१ जुलै, २०२४ पासून दर महा रु. १५०० आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR