नवी दिल्ली : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानानंतर काँग्रेसकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यावरून संसदेत बराच गदारोळही झाला. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याही राजीनाम्याची मागणी होत आहे. प्रामुख्याने राजस्थानातील काँग्रेस नेत्यांनी गडकरींवर निशाणा साधला आहे.
गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यामागचे कारण म्हणजे जयपूर-अजमेर हायवेवर झालेला अपघात. दोन दिवसांपूर्वी झालेल्या या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताला गडकरी यांचे मंत्रालय आणि टोल कंपनी जबाबदारी असल्याचा आरोप करत काँग्रेस नेत्यांनी गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
राजस्थानातील काँग्रेसचे नेते व माजी मंत्री प्रताप सिंह खचारियावास यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच एनएचआयए आणि टोल कंपनीला दोषी धरले आहे. एनएचएआय हा देशातील सर्वात भ्रष्टाचार विभाग असून या १३ जणांचा बळी या भ्रष्टाचारी यंत्रणेनेच घेतल्याचा संताप माजी मंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
टोलवसुलीच्या माध्यमातून मोठा महसूल गोळा करूनही कंपनीला हायवेचे काम पूर्ण करता आलेले नाही. तसेच सुरक्षेबाबत दक्षताही घेण्यात आलेली नाही. गडकरी हे या टोल कंपन्यांच्या बाजूने असल्याचा आरोप खचारियावास यांनी केला आहे. टोल कंपनी आणि एनएचएआयच्या अधिका-यांना तातडीने अटक करायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
६ महिन्यांत दुरुस्ती करण्याचे आश्वासन
जयपूर-दिल्ली हायवेची २०१४ मध्ये गडकरी यांनी हेलिकॉप्टरमधून पाहणी केली होती. सहा महिन्यांत दुरुस्ती करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. पण अजूनही हायवे असुरक्षित असून भ्रष्टाचाराने बरबटलेला असल्याचे खचारियावास यांनी सांगितले. अपघाताली मृतांच्या कुटुंबियांना तातडीने एक कोटींची मदत आणि एकाला सरकारी नोकरी देण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.