नागपूर : प्रतिनिधी
फोडाफोडीच्या प्रकाराबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे. दिल्लीत झालेल्या या भेटीत आगामी मुंबईसह इतर महापालिकांबाबतच्या रणनितीबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई व मुंबई क्षेत्रातील महापालिकांच्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती करण्याच्या दृष्टीने या भेटीत चर्चा झाल्याचे समजते.
रवींद्र चव्हाण हे मध्यरात्री दिल्लीत पोहोचले. अमित शहांची भेट घेत त्यांनी त्यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा केली. आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरम्यान चर्चा झाली होती. या चर्चेचा सारांश चव्हाण यांनी अमित शहांच्या कानावर घातल्याचे सूत्रांनी सांगितले. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आले आहे.
नगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीच्या नेत्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. विशेषत: रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात तणाव निर्माण झाल्याचे चित्र होते. एकनाथ शिंदे यांनीही या काळात अचानक दिल्ली गाठत अमित शहांची भेट घेतली होती मात्र ही परिस्थिती केवळ नगरपालिका निवडणुकांपुरतीच मर्यादित होती. आता येणा-या महापालिका निवडणुकांसाठी पुन्हा नव्याने चर्चा होणार असल्याचे युतीमधील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता आगामी महापालिका निवडणुकांच्या रणनितीबाबत अमित शहांनी चव्हाण यांना निश्चितच योग्य तो कानमंत्र दिला असेल. त्यानुसार आता राज्यातील नेत्यांमध्ये चर्चेला सुरुवात होणार असल्याचे समजते.

