मुंबई : जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पीओके अर्थात पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ले केले. जवळपास ७ शहरांमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ले करण्यात आले आहेत.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना, भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांचे तळ क्षेपणास्त्र हल्ल्यांद्वारे उद्वस्त केले. या नंतर निवृत्त लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी सूचक ट्विट केले आहे. त्यांनी एक्स या समाज माध्यमावर अभी पिक्चर बाकी है, असे ट्विट केले आहे.
जर पाकिस्तानने भारतातील लष्करी प्रतिष्ठानांना लक्ष्य करून संघर्ष वाढवण्याचा निर्णय घेतला तर असे आणखी हल्ले शक्य आहेत, असे माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी संकेत दिले आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २६ नागरिकांच्या क्रूर हत्याकांडानंतर धाडसी आणि सुनियोजित प्रत्युत्तर म्हणून, भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानी हद्दीत मोठ्या प्रमाणात लष्करी कारवाई केली.
पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (आयएसपीआर) चे संचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी सांगितले की, भारताने २४ क्षेपणास्त्रे डागली आहेत. सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, पंतप्रधान मोदी रात्रभर ऑपरेशन सिंदूरवर लक्ष ठेवत होते.
पाक लष्करी तळाला लक्ष्य केले नाही
भारतीय लष्कराने म्हटले आहे की पाकिस्तानी लष्करी प्रतिष्ठानांना लक्ष्य करण्यात आले नाही. दहशतवाद्यांच्या अड्डयाला लक्ष्य करण्यात आले आहे. दुसरीकडे, सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, ही एक संयुक्त लष्करी कारवाई होती, ज्यामध्ये भारतीय लष्कर आणि हवाई दलाने एकत्रितपणे अचूक स्ट्राइक शस्त्रे वापरली. सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, भारतीय लष्कराने पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी जैश-ए-मोहम्मद आणि लष्करच्या अड्डयांवर हल्ला करण्याच्या उद्देशाने लक्ष्य निवडले होते.