सोलापूर : पतीच्या आत्महत्येनंतर व्यथित पत्नीने लेकीसह आयुष्याची अखेर केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील घाटणे येथे हा प्रकार घडला आहे. हरिभाऊ जानू लोंढे यांनी गेल्या गुरुवारी दुपारी आत्महत्या केली होती. पतीचा विरह सहन न झाल्याने हताश झालेल्या पत्नीने देखील अवघ्या चार वर्षाच्या लेकीसह त्याच रात्री गावातील सार्वजनिक विहिरीत उडी घेतली.
गुरुवारी रात्रीच १२ ते १ वाजताच्या दरम्यान महिलेने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली होती. मात्र ही घटना रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. एकाच कुटुंबातील तिघांनी एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये आत्महत्या केल्याने गावावर शोककळा पसरली आहे सोलापूर ग्रामीण पोलिस या आत्महत्यांच्या तीन घटनांचा कसोशीने तपास करत आहेत.
जनाबाई हरिभाऊ लोंढे (३२) आणि साजरी हरिभाऊ लोंढे (४) असे मयत झालेल्या मायलेकींची नावे आहे. याबाबत सोलापूर ग्रामीण पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी ६ फेब्रुवारी रोजी दुपारी हरिभाऊ जानू लोंढे (रा. घाटणे, ता. माढा) यांनी गळफास लावून आत्महत्या केली होती.
पोटच्या मुलीचे पुढे कसे होणार? या विचाराने हताश झालेली पत्नी जनाबाई मुलगी साजरी हिला सोबत घेऊन घरातून निघून गेली होती. तीन दिवसांनंतर या मायलेकीचे मृतदेह विहिरीत तरंगताना आढळले.
जनाबाई मुलगी साजरी हिला सोबत घेऊन बेपत्ता झाल्या होत्या. सर्वत्र शोध घेण्यात येत होता. तीन ते चार दिवसांनंतर शाळकरी मुलांना गावातील मंदिराच्या जवळील सार्वजनिक विहिरीत एक महिला व मुलगी पाण्यावर तरंगताना दिसली. मुलांनी ही गोष्ट गावातील ग्रामस्थांना सांगितली. त्यानंतर महिलेचे नातेवाइकही तिथे आले. त्यांनी बेपत्ता असलेल्या मायलेकी याच आहेत हे ओळखले. पोलिस आणि ग्रामस्थांच्या मदतीने या दोघांना विहिरीतून बाहेर काढून अंत्यसंस्कार करण्यात आले.