नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल करण्यात आले असून रमेश चेन्नीथला यांच्याकडे महाराष्ट्राचे प्रभारीपद देण्यात आले आहे. तेलंगणमधील विजयानंतर पक्षाने माणिकराव ठाकरे यांच्याकडे गोवा, दमण आणि दीव, दादरा आणि नगर-हवेलीच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपविली आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे फेरबदल केले आहेत. एकूण बारा सरचिटणीस तसेच बारा प्रभारी नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिली. राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानल्या जाणा-या उत्तरप्रदेशचे प्रभारीपद प्रियंका गांधी-वद्रा यांच्याकडून काढून घेत महाराष्ट्रातील नेते अविनाश पांडे यांच्याकडे देण्यात आले आहे. राजस्थानचे नेते सचिन पायलट यांच्याकडे छत्तीसगडचे प्रभारीपद सोपविण्यात आले आहे. पायलट यांच्याकडे पक्षाच्या सरचिटणीसपदाची जबाबदारीदेखील सोपविण्यात आली आहे. कु. शैलजा यांच्या जागी पायलट यांना संधी देण्यात आली आहे.
वेणुगोपाल संघटन सचिव
ज्येष्ठ नेते मोहन प्रकाश यांच्याकडे बिहारची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राजस्थानची जबाबदारी सुखजिंदरसिंग रंधावा यांना देण्यात आली आहे. रणदीपसिंह सुरजेवाला यांच्याकडून मध्यप्रदेशची जबाबदारी काढून घेण्यात आली असून त्यांच्याकडे आता केवळ कर्नाटकचे कामकाज राहील. जितेंद्रसिंह यांच्याकडे मध्य प्रदेशची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. वेणुगोपाल हे संघटन सचिव पदावर कायम राहणार असून जयराम रमेश यांच्याकडे संपर्क विभागाचे प्रभारीपद असेल. अजय माकन यांच्याकडील खजिनदारपद कायम ठेवण्यात आले आहे. विजय सिंगला आणि मिलिंद देवरा यांना सह-खजिनदार करण्यात आले आहे.
वासनिक यांच्याकडे गुजरातची जबाबदारी
अन्य प्रमुख नियुक्त्यांमध्ये मुकुल वासनिक यांच्याकडे गुजरातची जबाबदारी देण्यात आली आहे. कु. शैलजा यांच्याकडे उत्तराखंड, जी. ए. मीर यांच्याकडे झारखंड आणि पश्चिम बंगाल, दीपा दासमुन्शी यांच्याकडे केरळ, लक्षद्वीप आणि तेलंगण, ए. चेल्लाकुमार यांच्याकडे मेघालय, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, अजोय कुमार यांच्याकडे ओडिशा, तमिळनाडू, पुद्दुचेरी, भरतसिंहंिसह सोळंकी यांच्याकडे जम्मू-काश्मीर, राजीव शुक्ला यांच्याकडे हिमाचल प्रदेश आणि चंडीगड, देवेंद्र यादव यांच्याकडे पंजाब, गिरीश चोडनकर यांच्याकडे त्रिपुरा, सिक्किम, नागालँड, मणिपूर आणि मनिकम टागोर यांच्याकडे आंध्र प्रदेश, अंदमान आणि निकोबारची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
जाहीरनामा समितीचे चिदंबरम अध्यक्ष
काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक समितीचे गठन केले असून अध्यक्षपदी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची नियुक्ती केली आहे. या समितीमध्ये काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनाही समाविष्ट केले आहे. या १६ सदस्यीय समितीमध्ये संयोजक म्हणून छत्तीसगडचे माजी उपमुख्यमंत्री टी. एस. सिंगदेव यांच्यासह कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, खासदार जयराम रमेश, खासदार शशी थरूर, लोकसभेतील उपनेते गौरव गोगोई, खासदार व कवी इम्रान प्रतापगढी, गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी यांचा समावेश आहे.