नवी दिल्ली : दरवर्षी पावसाळ्यात भाज्या महाग होतात. मात्र, यावेळी त्याचा परिणाम जास्त दिसून येत आहे. गेल्या महिनाभरापासून टोमॅटोचे भाव गगनाला भिडले होते. टोमॅटोचे भाव काही प्रमाणात कमी होताच आता कांद्याने नागरिकांचे बजेट बिघडवले आहे. २० रुपये किलोने विकल्या जाणा-या कांद्याचा दर आता ८० रुपयांवर पोहोचला आहे. कांद्याशिवाय कोणत्याही भाजीची चव अपूर्ण असते. एवढेच नाही तर बाजारातील जाणकारांच्या मते १५ ऑगस्टपर्यंत कांद्याचे भाव १००चा टप्पा ओलांडतील. याशिवाय हिरवी मिरची, कोथिंबीर आदींचे भावही उच्चांकी पोहोचले आहेत.
दरम्यान, टोमॅटोप्रमाणेच कांदाही पावसाळ्यात खराब होतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याशिवाय बाजारात त्याची आवकही कमी झाली आहे. ही महागाई ऑगस्टअखेर किंवा सप्टेंबरपर्यंत कायम राहू शकते. त्यानंतर भाजीपाला मूळ दरावर येण्यास सुरुवात होईल. १५ ऑगस्टपर्यंत काही शहरांमध्ये कांद्याचे भाव १०० रुपयांचा टप्पा ओलांडतील, असे जाणकारांचे मत आहे. भाजी मार्केट तज्ज्ञ नवीन सैनी सांगतात की, दरवर्षी पावसाळ्यात भाज्या महागतात. मात्र यावेळी प्रचंड महागाई झाली आहे. याचे थेट कारण म्हणजे बाजारात भाजीपाल्याची आवक कमी होणे, कारण पावसाळ्यात भाजीपाला जास्त काळ सुरक्षित राहत नाही.
कांद्याच्या किमती चार पटींनी वाढल्या
गेल्या एका महिन्यात काही शहरांमध्ये कांद्याचे भाव २२५ टक्क्यांनी वाढले आहेत. ग्राहक व्यवहार विभागाच्या साईटनुसार, मंगळवारी दिल्लीसह पश्चिम उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये कांद्याचे भाव गगनाला भिडलेले दिसले. किरकोळ बाजाराबाबत बोलायचे झाले तर दिल्लीच्या गाझीपूर मंडईत कांदा ८० रुपये किलोने विकला जात होता, त्याचवेळी दिल्लीपासून थोड्या अंतरावर असलेल्या मेरठमध्ये कांद्याचे दर ८० ते ९० रुपये किलो होते. ही कांद्याच्या दरात अचानक झालेली वाढ आहे.