मुंबई : प्रतिनिधी
यंदा कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. परंतु राहिलेल्या कांद्याला तर चांगला दर मिळेल, अशी कांदा उत्पादक शेतक-यांना आशा होती. परंतु केंद्राने पुन्हा कांदा निर्यातीवर बंदी घातली. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी संतप्त झाले असून, शेतक-यांनी लगेचच आंदोलन सुरू केले. दरम्यान, केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार मैदानात उतरणार असून, सोमवारी चांदवड (जि. नाशिक) येथे शेतक-यांच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
राज्यात सोयाबीनच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. त्यात दुधाचे दरही पडलेले आहेत. यावरून शेतक-यांमध्ये आधीच असंतोष वाढलेला असताना केंद्र सरकारने आता कांदा निर्यातीवर बंदी घातली. तत्पूर्वी उसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली. कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने कांदा निर्यातबंदी घातल्याचे केंद्राने सांगितले. ही बंदी ३१ मार्च २०२४ पर्यंत घातली गेल्याचे कालच सांगण्यात आले. यामुळे शेतक-यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या निर्णयाविरोधात नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून, ठिकठिकाणी आंदोलने सुरु केली आहेत. तसेच कांदा लिलावही बंद करण्यात येत आहे. त्यामुळे कांदाप्रश्न पेटण्याची शक्यता वाढली आहे. त्यातच कांदा उत्पादक शेतक-यांसाठी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरणार आहेत. सध्या नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे आंदोलन सुरू आहे. त्यातच शेतक-यांच्या विविध प्रश्नांवर शरद पवार सोमवारी चांदवड येथील आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यामुळे कांदा आंदोलन पेटण्याची चिन्हे आहेत.
११ डिसेंबरला एल्गार
विविध प्रश्नांसाठी ११ डिसेंबर रोजी चांदवडमध्ये शेतक-यांनी एल्गार पुकारला असून, मुंबई-आग्रा रोडवर चांदवड चौफुली येथे शेतकरी आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात खुद्द शरद पवार सहभागी होणार आहेत. त्यामुळे या आंदोलनात शेतक-यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.