मुंबई : महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांमध्ये मोठा करार झाला आहे. तापी मेगा रिचार्ज प्रकल्पासाठी एका महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक करार झाला आहे. सुमारे १९,२४४ कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील खारपणा पट्टयातील शेतकरी आणि नागरिकांना मुबलक पाणी मिळणार आहे.
भोपाळ येथे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश आंतरराज्य नियंत्रण मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्यासह दोन्ही राज्यांचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, तुलसीराम सिलावट, कुंवर विजय शाह आणि दोन्ही राज्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, भोपाल, मध्य प्रदेश येथे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या उपस्थितीत “संयुक्त सिंचन आणि जलविद्युत प्रकल्पांसाठी महाराष्ट्र-मध्य प्रदेश अंतरराज्यीय नियंत्रण मंडळाची २८ वी बैठक पार पडली. या बैठकीत मी सहभागी झालो होतो. बैठकीनंतर ‘तापी बेसिन मेगा रिचार्ज प्रकल्पा’संदर्भात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकार यांच्यात सुमारे १९,२४४ कोटींच्या ऐतिहासिक सामंजस्य करारावर संयुक्तपणे स्वाक्ष-या करण्यात आल्या.
२ लाखांहून अधिक जमीन सिंचनाखाली येणार
देवेंद्र फडणवीस म्हणाले, या प्रकल्पामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारांना मोठा लाभ होणार आहे. अंदाजे मध्य प्रदेशातील १,२३,०८२ हेक्टर आणि महाराष्ट्रातील २,३४,७०६ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. तसेच अकोला, बुलढाणा आणि अमरावतीसह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील खारट पाण्याच्या भागांना विशेष लाभ होणार आहे. या प्रकल्पामुळे त्या भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची सुटणार आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांना मोठा फायदा होणार असून विविध प्रकारच्या पाण्याच्या गरजाही पूर्ण होणार आहेत.