अहमदपूर (रविकांत क्षेत्रपाळे) : सध्या येथील नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. कामाच्या टक्केवारीवर डोळा ठेवून असलेल्या नगरसेवक व नगराध्यक्षांना मतदान न करता विकासाचा सर्वांगीण ध्यास असलेल्यांनाच मतदारांनी मतदान करण्याची मागणी मतदारांमधून दैनिक एकमत राबवित असलेल्या youtube चॅनलच समोर बोलताना नागरिकांनी आपल्या बोलक्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
शहरातील अनेक प्रभागांमध्ये नाल्याची, रस्त्याची सुविधा नाही. शहरातील नवतरुण युवकांसाठी-मुला मुलींना खेळण्यासाठी क्रीडांगण होणे आवश्यक आहे. शहरांमध्ये भाजी मार्केट साठी जागा भरपूर उपलब्ध आहे पण नगर पालिकेने भाजी मार्केट व्यवस्थित बांधणे गरजेचे आहे. या शहरात शेतकरी व्यापारी आपली भाजी चक्क रस्त्याच्या बाजूला विक्री करतात. शहरात अनेक प्रभागांमध्ये खूप मोठे ओपन स्पेस आहेत त्या ठिकाणी लहान मुलांसाठी बालोद्यान होणे खुप गरजेचे आहे. याबरोबरच शहरातील मोकळ्या जागेत म्हातारे आजी-आजोबा यांच्यासाठी नाना- नाणी पार्क झाला तर यांना विरंगुळा करायला अडचण येत नाही. आजपर्यंत कोणालाही हे करावेसे वाटले नाही. शहरामध्ये खूप ठिकाणी नगरपरिषदेची मोकळी जागा आहे अशा ठिकाणी शहराचे वैभव वाढावे किंवा सुशोभीकरणासाठी सोयीसुविधांचा अभाव असल्याचे नागरिकांनी बोलून दाखविले.
येथील महात्मा गांधी महाविद्यालय व इतर शैक्षणिक सुविधांमुळे शैक्षणिक पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहराची झपाट्याने मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पण शहरात नाल्याची ,रस्त्यांची योग्य सोय होणे आवश्यक आहे. काही प्रभागात पावसाळ्यामध्ये नागरिकांना घरी जाण्यासाठी रस्त्याच्या सुविधा नसल्यामुळे वाहन घेऊन जाणे, पायी चालत जाणे फार कठीण आहे. याकडे नगरसेवक व नगराध्यक्षांनी काळजीने लक्ष देऊन विकासाची कामे करणे खूप गरजेचे आहे. नवीन वसाहतीमध्ये नाल्याच्या सुविधा होणे आवश्यक आहे.शहरातील मध्यवस्तीमध्ये सुद्धा मजबूत रस्ते, नाल्या बांधकाम होणे गरजेचे आहे.स्वच्छतेच्या बाबतीत घनकचरा टेंडर घेणाऱ्यांनी जास्तीच्या फायद्याचाच फक्त विचार न करता शहरातील स्वच्छतेकडे पाहणे महत्त्वाचे आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य व्यवस्थित राहणार आहे अन्यथा शहरात यापेक्षाही जास्त डुकरांचा सुळसुळाट होणार आणि आरोग्य धोक्यात येणार हे निश्चित.
शहराच्या ग्रामीण रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरची लाखो रुपयांची इमारत धुळखात पडून आहे. येथे हाडाच्या ऑपरेशन साठी लागणारी खूप महत्त्वाची आणि महागडी मशीन,याबरोबरच हाडाचे डॉक्टर उपलब्ध आहेत. येथील नॅशनल हायवेवर अपघात झाल्यानंतर रुग्णाला , तसेच विष प्राशन केलेल्या रुग्णांना, प्रसूतीसाठी आलेल्या अनेक महिलांना, हृदयाचे रुग्ण या सर्वांना येथे तात्पुरता उपचार करून चक्क लातूरला पाठवले जातात. ग्रामीण रुग्णालयाची 102 ॲम्बुलन्स सेवा पूर्णता: बंद आहे.नॉर्मल प्रसूती झालेल्या महिलांना 102 ॲम्बुलन्स मधून सोडता येत नाही. अपघातासाठी वापरण्यात येणाऱ्या 108 या वाहनावर कामाचा खूपच बोजा वाढल्याचे हि नागरिकांनी सांगितले.येथील ट्रामा केअर सेंटर त्वरित सुरू होणे रुग्णांसाठी फार आवश्यक आहे.
या शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी नगरपरिषद व मागील नगरसेवक , नगराध्यक्ष हे आणि प्रशासक अपयशी ठरल्याचे नागरिकांनी सांगत आपली खंत व्यक्त केली. सर्वत्र नागरिकांना शुगर,आजारामुळे किंवा महिलांना ,व्यापाऱ्यांना शहरात मुतारीची, शौचालयाची सोय होणे आवश्यक असल्याचे बोलून दाखविले आणि ते खरी ही आहे. शहरात नगर परिषदेने रिकाम्या जागेत मुतारी चे बांधकाम करणे आवश्यक आहे. शहरात फक्त एकच मुतारी असून तेही बंद राहते. त्याची सुविधा नाही आणि तेथे खूप घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. या मुतारीच्या स्वच्छतेकडे ही लक्ष देणे गरजेचे आहे.
शहरातील नगर परिषदेच्या नवीन इमारतीचे बांधकाम गेल्या चार वर्षापासून सुरू आहे. बांधकामाची मुदत संपून दोन वर्षे होऊन गेले काम खूपच संथ गतीने सुरू आहे. नगर परिषदेने आपल्या जुन्या इमारतीच्या जागेत शेकडो दुकाने बांधलेले आहेत त्यातील अर्धे रिकामी आहेत. शहरात नगरपरिषदेची मोक्याच्या आणि महत्त्वाच्या ठिकाणी खूप जागा आहे. तेथे इमारत न बांधता शेड मारून लोकांना भाडेतत्त्वावर दिले आहेत.या बरोबरच शहराच्या नांदेड रोड ,अंबाजोगाई रोड आणि नगरपरिषदेच्या समोरील भागात खूप जागा आहे. तेथे टोलेजंग इमारत झाली तर शहराचे वैभव वाढेल तेथे दुकानाचे गाळे काढले तर नगरपरिषदेला खूप आर्थिक फायदा होणार आहे आणि व्यापाऱ्यांना कमी दरामध्ये दुकाने उपलब्ध होणार आहेत पण निवडून आल्यानंतर नगरसेवकच राजकारण करून स्वतःचा फायदा कसा करून घेता येईल याकडेच अनेकांचे लक्ष लागल्याचे आजपर्यंत शहरातील नागरिकांना पाहायला मिळाले आहे

