वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
सध्या जगभरात एआयची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. ‘एआय’मुळे अनेकांची कामे सोपी झाली आहेत. पण ‘एआय’मुळे अनेकांच्या नोक-या जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. काही दिवसापूर्वी मायक्रोसॉफ्टने मोठा निर्णय घेत ६,००० जणांना नोकरीवरून कमी केले. यामध्ये मोठ्या संख्येने सॉफ्टवेअर अभियंते बळी ठरले आहेत. एका अहवालानुसार, वॉशिंग्टनमधील कर्मचा-यांच्या कपातीमध्ये ४० टक्के कर्मचारी हे सॉफ्टवेअर अभियंते आहेत.
मायक्रोसॉफ्टचे उपाध्यक्ष जेफ हुल्से यांनी त्यांच्या टीमला ५० टक्के कोड जनरेट करण्यासाठी ओपन एआय पॉवर्ड चॅटबॉट वापरण्यास सांगितले. त्यांच्या टीममध्ये एकूण ४०० कर्मचारी होते. ज्यावेळी कंपनीने कर्मचारी कमी केले, त्यावेळी यामध्ये सर्वात जास्त एआय वापरणा-यांची संख्या मोठी होती. एआय वापरणा-यांनाच सर्वात जास्त फटका बसला.
दरम्यान, आता या कर्मचा-यांनीच आपल्या रिप्लेसमेंटसाठी एआयला ट्रेनिंग दिली का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला हे नेहमी ‘एआय’ बाबत उघडपणे बोलतात. अनेक प्रकल्पांमध्ये ‘एआय’ सुमारे दोन तृतीयांश कोड लिहित आहे, असे त्यांनी कबुल केले आहे. या बदलामुळे आता नोकरी करणा-यांसमोर मोठे आव्हान आहे.
ही कपात फक्त ज्यूनिअर कोडरपुरती मर्यादित नाही. उत्पादन व्यवस्थापन आणि तांत्रिक कार्यक्रम व्यवस्थापन यासारखी कामे करणा-यांनाही याचा फटका बसला आहे. ‘एआय’वर अवलंबून राहणे हे यामागचे कारण असल्याचे बोलले जाते.
ज्यूनिअर, सिनिअर इंजिनिअर्सची कपात
या कपातीमध्ये ज्यूनिअर आणि सिनिअर इंजिनिअरांची कपात करण्यात आली आहे. काही दिवसात झालेल्या कपातीचा परिणाम फक्त कोडर्सवरच नाही तर इतर विभागांवरही झाला आहे. जानेवारी-मार्च तिमाहीत चांगली कमाई असूनही कंपनी कर्मचा-यांना कामावरून काढून टाकत आहे.