सॅन जोस : सिस्को या अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनीने कर्मचारी कपातीच्या नव्या राऊंडमध्ये ४००० हून अधिक कर्मचारी कमी करणार असल्याचे वृत्त रॉयटर्सने दिलं आहे. विशेष म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अर्थात कृत्रीम बुद्धिमत्तेच्या विस्तारामुळं हा फटका कर्मचा-यांना बसणार आहे.
रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, सिस्को कंपनीनं आता सायबर सुरक्षा आणि कृृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या इमर्जिंग क्षेत्रांमध्ये विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. त्यामुळं सिस्को नव्या कर्मचारी कपातीची महत्वाची घोषणा करणार आहे. या प्रकरणाशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, नोकरकपातीची संख्या या वर्षाच्या सुरुवातीला काढण्यात आलेल्या ४,००० पदांइतकी किंवा त्याहूनही अधिक असू शकते.
कॅलिफोर्नियातील सॅन जोस इथे कंपनीचे मुख्यालय आहे. पुढील आठवड्यात कंपनीच्या चौथ्या तिमाहितील आर्थिक डेटा जाहीर होणार आहे. यांमध्ये कर्मचारी कपातीचा महत्वाचा मुद्दा असणार आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये झालेल्या कर्मचारी कपातीपूर्वी सिस्कोमध्ये जुलै २०२३ पर्यंत सुमारे ८४,९०० कर्मचारी होते.