अयोध्या : अयोध्येतील राम मंदिरातील प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आजपासून पूजा सुरू करण्यात आली आहे. एकीकडे प्रायश्चित पूजा सुरू झालेली असताना, दुसरीकडे अयोध्येतील सुरक्षा व्यवस्था देखील वाढवण्यात आली आहे.
२२ जानेवारीला जगभरातील व्हीआयपी लोक आणि श्रीरामभक्त अयोध्येत उपस्थित असणार आहेत. यामुळेच या पवित्र दिवशी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अयोध्येचं रुपांतर एका अभेद्य किल्ल्यात करण्यात आलं आहे. सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात AI चा वापर करण्यात येतो आहे.
अयोध्येमध्ये लोकांच्या सुरक्षेसाठी तब्बल 10 हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तसंच एक अँटी-ड्रोन प्रणाली याठिकाणी तैनात केली आहे, हे तंत्रज्ञान आजूबाजूला उडणारी कोणतीही अनधिकृत वस्तू टिपून, त्याचा टेकऑफ पॉइंट शोधून काढू शकते. एवढंच नाही, तर हवेतच कोणतंही ड्रोन आपल्या कंट्रोलमध्ये घेण्याची क्षमता या प्रणालीमध्ये आहे. उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी याबाबत माहिती दिली.