आग्रा : भारतीय वायुसेनेच्या आकाश स्कायडायव्हिंग संघाचे पॅरा जंप प्रशिक्षक जखमी झाले असून त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शनिवार दि. ५ एप्रिल रोजी ही धक्कादायक घटना घडली. उत्तर प्रदेशातील आग्रा येथे डेमो ड्रॉप दरम्यान ते जखमी झाले. त्यांनी हेलिकॉप्टरमधून उडी घेतली, पण काही बिघाडामुळे त्यांचे पॅराशूट वेळेवर उघडू शकले नाही. यामुळे ते थेट खाली पडले, ज्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
ही घटना शनिवारी डेमो ड्रॉप दरम्यान रात्री साडे नऊच्या सुमारास घडली, जेव्हा ४१ वर्षीय वॉरंट ऑफिसर रामकुमार तिवारी यांनी हेलिकॉप्टरमधून उडी मारली आणि पॅराशूट न उघडल्यामुळे ते थेट जमिनीवर पडले. काही तांत्रिक बिघाडामुळे त्यांचे पॅराशूट उघडले नाही, त्यामुळे हा अपघात झाला आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. लष्करी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
या प्रकरणाबाबत सहाय्यक पोलिस आयुक्त विनायक भोसले यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, वॉरंट ऑफिसर रामकुमार तिवारी यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांना रात्री १२ वाजण्याच्या सुमारास रुग्णालयातून मिळाली. पोलिसांनी त्यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. वॉरंट ऑफिसर रामकुमार तिवारी यांच्यासाठी, भारतीय हवाई दलाने आपल्या एक्स अकाऊंटवर लिहिले की आयएएफच्या आकाश गंगा स्कायडायव्हिंग टीमच्या पॅरा जंप प्रशिक्षकाचे आज आग्रा येथे डेमो ड्रॉप दरम्यान झालेल्या दुखापतीमुळे निधन झाले. वायुसेना या नुकसानीबद्दल दु:ख व्यक्त करते आणि कुटुंबाप्रती शोक व्यक्त करते. या दु:खाच्या प्रसंगी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.
सपा प्रमुख अखिलेश यादव यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. या घटनेसोबतच त्यांनी फ्लाइट लेफ्टनंटच्या मृत्यूचाही उल्लेख केला. त्यांनी लिहिले, प्रथम, गुजरातमधील जामनगर येथे लढाऊ विमानाच्या अपघातामुळे फ्लाइट लेफ्टनंटचा मृत्यू झाल्याची बातमी आणि आता पॅराशूट न उघडल्यामुळे आग्रा येथे हवाई दलातील एका अधिका-याचा मृत्यू ही अत्यंत दु:खद बाब आहे. सुरक्षेबाबत केलेली तडजोड जीवघेणी ठरते. या प्रकरणांमध्ये, प्रत्येक स्तरावर गुणवत्तेची सखोल आणि गंभीर तपासणी व्हायला हवी, जेणेकरून भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये.