हैदराबाद : भारतीय वायुसेनेच्या शिकाऊ विमान तेलंगणामध्ये अपघातग्रस्त झाले आहे. या अपघातात दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. तेलंगणामध्ये भारतीय हवाई दलाचे (आयएएफ) ट्रेनर विमान कोसळल्याची बातमी समोर आली आहे. तेलंगणातील मेडक जिल्ह्यात ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताच्या वेळी विमानात एक ट्रेनर पायलट आणि एक ट्रेनी पायलट होते. या अपघातात दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. हवाई दलाने ही माहिती दिली आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, सकाळी सोमवारी ८.55 वाजता तेलंगणातील दिंडीगुल येथील वायुसेना अकादमीमध्ये पिलाटस प्रशिक्षण विमानाला अपघात झाला. या विमान अपघातात हवाई दलाच्या दोन वैमानिकांचा मृत्यू झाला. विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोन वैमानिकांपैकी एक प्रशिक्षक होता तर दुसरा हवाई दलाचा कॅडेट होता.
अपघातानंतर काही मिनिटांतच विमान जळून खाक झाले आहे. ज्या ठिकाणी विमान कोसळले, त्या ठिकाणी खूप मोठे दगडही होते. पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरु आहे. वायूदलाकडून या अपघाताची चौकशी करण्यात येत आहे. पिलाटस हे एक लहान विमान आहे, जे हवाई दल आपल्या वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी वापरले जाते.
संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
तेलंगणामध्ये झालेल्या विमान अपघातावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे. राजनाथ सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले आहे की, ‘हैदराबादजवळ झालेल्या अपघाताची बातमी समजल्यावर दुःख झाले. दोन वैमानिकांना आपला जीव गमवावा लागला, हे अत्यंत दुःखद आहे. या दु:खाच्या प्रसंगी शोकाकुल कुटुंबियांसोबत माझी संवेदना आहेत. या अपघात प्रकरणात अपघाताचे कारण स्पष्ट करण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत.