नवी दिल्ली : इस्राईल आणि हमास यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने तेल अवीवसाठी उड्डाणे ३० नोव्हेंबरपर्यंत स्थगित केली आहेत. एअरलाइनच्या प्रवक्त्याने वृत्तसंस्थेला सांगितले की, तेल अवीवची उड्डाणे ३० नोव्हेंबरपर्यंत स्थगित करण्यात आली आहेत. साधारणपणे एअर इंडियाची दिल्ली ते तेल अवीव अशी पाच साप्ताहिक उड्डाणे आहेत. एअर इंडियाने ७ ऑक्टोबरपासून तेल अवीव किंवा इस्राईलला जाणारी उड्डाणे रद्द केली आहेत.
इस्राईलकडून सातत्याने गाझा पट्टीवर हवाई हल्ले होत असून मोठ्या प्रमाणात वित्त आणि जीवितहानी होत आहे. इस्रायलची राजधानी असलेल्या तेल अवीव शहरातही याचे पडसाद उमटत आहे. परिणामी या तणावाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने तेल अवीवला जाणारी नियोजित उड्डाणे काही काळासाठी स्थगित केली आहेत. एअर इंडियाने ७ ऑक्टोबरपासून तेल अवीवला जाण्यासाठी आणि तेथून भारतात येणारी नियोजित उड्डाणे रद्द केली होती. गेल्या महिन्यात, वाढत्या संघर्षामुळे इस्राईलमधून परत येऊ इच्छिणाऱ्या भारतीयांना परत आणण्यासाठी सरकारच्या ऑपरेशन एक भाग म्हणून एअरलाइनने दिल्ली ते तेल अवीव अशी काही चार्टर्ड उड्डाणे चालवली होती.