मुंबई : बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांचा कार्यकाळ या महिन्यात संपत आहे. त्यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे.
वृत्तानुसार, माजी भारतीय क्रिकेटपटू पार्थिव पटेल आणि प्रज्ञान ओझा हे त्यांची जागा घेण्यासाठी सर्वात प्रबळ दावेदार आहेत. बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा लवकरच होणार आहे. आगरकर यांनी बुधवारी झालेल्या निवड समितीच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले आहे आणि ही त्यांची शेवटची बैठक असू शकते. आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी व्हाईट-बॉल मालिका आणि इराणी ट्रॉफीसाठी संघांची घोषणा केली.
आगरकर यांनी रेस्ट ऑफ इंडिया संघाच्या निवड समितीचेही नेतृत्व केले. माजी वेगवान गोलंदाज आगरकर यांच्या जागी बीसीसीआयच्या वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता बनण्याच्या शर्यतीत पार्थिव पटेल आणि प्रज्ञान ओझा आघाडीवर आहेत. आगरकर यांचा करार पुढील वर्षी होणा-या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत वाढवण्याबाबत चर्चा होती. तथापि, सूत्रांनुसार, बीसीसीआयच्या एका गटाचे मत आहे की त्यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता जवळजवळ नाही.
















