27.9 C
Latur
Sunday, September 29, 2024
Homeमहाराष्ट्रमहायुतीत अजित पवार एकाकी!

महायुतीत अजित पवार एकाकी!

मुंबई : प्रतिनिधी
राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी गुरूवारी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांचा अर्ज दाखल करण्यात आला. सुनेत्रा पवार यांचा अर्ज दाखल करताना अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि आमदार नरहरी झिरवळ उपस्थित होते. मात्र, सत्ताधारी महायुतीमधील अन्य कोणताही नेता उपस्थित नसल्याने राजकीय भूवया उंचावल्या गेल्या आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये अजित पवार एकाकी पडले आहेत का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

दुसरीकडे, सुनेत्रा पवारांचा अर्ज दाखल केला जात असतानाच महायुतीचे अनेक नेते मुंबईत हजर असतानाही विधानभवनात अर्ज भरण्यासाठी मात्र कुणीच हजर नव्हते. यामुळे महायुतीत सारे काही आलबेल नसल्याचे दिसते. गेल्या काही दिवसांपासून राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागेवरून अजित पवार गटांमध्ये रस्सीखेच सुरु होती. या जागेवर कोणाला संधी मिळणार अशी चर्चा असतानाच सुनेत्रा पवारांना संधी देण्यात यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती. आता अजित पवारांनी थेट सुनेत्रा पवार यांना संधी दिल्याने बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना टक्कर देण्यासाठी ही खेळी असल्याचे बोलले जात आहे. मात्र, महायुतीमधील नेत्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरला.

लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला अपेक्षित यश मिळालेले नाही. जागावाटपामध्ये अवघ्या चार जागा मिळाल्या होत्या. मात्र, चार पैकी तीन उमेदवार पराभूत झाले आहेत, केवळ प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे रायगडमधून निवडून आल्याने अजित पवार गटाची इभ्रत राखली गेली. मात्र, धाराशिव, बारामती आणि शिरूरमधून पराभवाला सामोरे जावे लागले. बारामतीची लोकसभा निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करून सुद्धा हाती निराशा आली. त्यामुळे अजित पवारांच्या महायुतीमधील राजकीय अस्तित्वाची चर्चा सुरू झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR