32.6 C
Latur
Friday, April 18, 2025
Homeमहाराष्ट्रमुंडेंच्या चौकशीसाठी अजित पवारांकडून समितीची स्थापना

मुंडेंच्या चौकशीसाठी अजित पवारांकडून समितीची स्थापना

सुरेश धस यांच्या तक्रारींची गंभीर दखल धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या

मुंबई : आवादा खंडणी आणि निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यावर देशमुख हत्येप्रकरणी आरोप होत असल्याने मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जावा, याकरीता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर दबाव वाढत आहे. दुसरीकडे जिल्हा नियोजन समितीचीमधील निधीच्या अपहारावरूनही त्यांच्यावर आरोप होत असताना आणि आमदार सुरेश धस यांनी त्यांना घेरलेले असताना अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या चौकशीकरिता समितीची स्थापना केली आहे.

मंत्री धनंजय मुंडे यांनी ७३ कोटींचा अपहार केल्याचा आरोप करून त्यासंबंधीचे पुरावे म्हणून सुरेश धस यांनी अजित पवार यांना एक पेनड्राईव्ह बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिला होता. पेनड्राईव्ह स्वीकारल्यानंतर आणि त्यातील पुरावे पाहिल्यानंतरच अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. धनंजय मुंडे यांच्या चौकशीसाठी अजित पवार यांनी समिती स्थापन केली.

भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या गैरव्यवहारांच्या आरोपांची अजित पवार यांच्याकडून दखल घेण्यात आली असून उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी या आरोपांच्या चौकशीसाठी समितीची स्थापना केल्याचे सांगितल्या जात आहे. मागील दोन वर्षात प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांची चौकशी हे पथक करणार आहे. अवर सचिव सुषमा कांबळी यांच्या आदेशान्वये स्थापन झालेल्या या पथकात तिघांचा समावेश आहे.

धाराशिव जिल्ह्यातील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संतोष भोर हे समितीचे अध्यक्ष असणार आहेत तर अर्थ आणि सांख्यिकी संचालनालय, मुंबईचे अपर संचालक म. का. भांगे आणि जालना जिल्ह्याचे जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सूर्यवंशी हे दोघे सदस्य आहेत.

मुंडे यांच्यावर निधी अपहाराचे आरोप
धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना परळी आणि अंबाजोगाईत काम न करता त्यांनी ७३ कोटींची बिले उचलल्याचा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला होता. त्याच आरोपांचे पुराव्यांबाबत उपरोक्त पेन ड्राईव्ह असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण डीबीटी योजना टाळून कृषी साहित्याची ज्यादा दराने खरेदी करण्यात आल्याचा ठपका ठेवत त्या संदर्भात नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR