ठाणे : प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतारे यांना आवरावे. आम्हीदेखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. कोणाला वाटत असेल की, कल्याण लोकसभा जिंकणे सोपे आहे. कल्याण लोकसभेत वेगळा निर्णय लागू शकतो, हे लक्षात ठेवावे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. शिवतारे यांनी बारामतीतून अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरण्याची भूमिका घेतली, तसे झाल्यास आम्ही कल्याणमध्ये डॅमेज करू, असे परांजपे यांनी म्हटले आहे.
शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल अत्यंत चुकीच्या अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिवसेनेचे नेते सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसची शक्तिस्थळे, स्वाभिमान, मग ती बारामती लोकसभा असेल की, रायगड लोकसभा असेल यांच्यावर वारंवार टीका-टिपणी करत असतात. माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे की, आपल्या नेत्यांना आवरावे अन्यथा आम्ही राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. आमच्या स्वाभिमानावर हल्ले केले जात आहेत. त्यात कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा जिंकणे सोपे आहे तर कल्याण लोकसभेत वेगळा निकालदेखील लागू शकतो. हे ध्यानात ठेवावे, असे म्हटले. महायुतीमध्ये चांगले वातावरण राहावे, असे मुख्यमंत्र्यांंना वाटत असेल तर आपल्या वाचाळवीर, शिवराळ विजय शिवतारे यांना आवरावे, एवढेच यानिमित्ताने सांगतो, असा इशारा प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिला.
२०१९ ला लोकसभेच्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा बारामती मतदारसंघात विजय झाला. सातत्याने बारामती मतदारसंघात विकास कामांच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिलेला आहे. याही वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ येथून निश्चित विजयी होईल. विजय शिवतारे त्यांचा वैयक्तिक अजेंडा चालवित असतील तर त्यांना योग्य ती समज मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजे, असे परांजपे यांनी यावेळी स्पष्ट केले. यावरून महायुतीच चांगलाच वाद उफाळून आला आहे. दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी आम्ही शिवतारेंना समज देऊ, असे म्हटले आहे.
थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
विजय शिवतारे यांनी केलेल्या वक्तव्याचा मी निषेध, धिक्कार करतो. त्यासंदर्भात मी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो आहे. अशा वाचाळवीरांवर कडक कारवाई केली पाहिजे, अशी मागणी मी केल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आज स्पष्ट केले. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादनासाठी खासदार तटकरे आज कराड (जि. सातारा) येथे आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.