पुणे : निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आल्यानंतर आता त्याचे पडसाद कार्यालयांमध्येही उमटू लागले आहेत. पक्ष आणि चिन्हाचा फैसला झाल्यानंतर राज्यातील कार्यालयांमध्ये सुद्धा वाद जाऊन पोहोचला आहे. पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावरून घड्याळ चिन्ह काढून टाकले आहे. मात्र भविष्यात पुण्यातील राष्ट्रवादी कार्यालयावर अजित पवार गट दावा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आले. त्यानंतर पुण्यातील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने जल्लोष साजरा केला एकमेकांना पेढे भरवत हा जल्लोष साजरा केला. अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनीदेखील विजयी गुलाल उधळला.
त्यानंतर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राष्ट्रवादी कार्यालयावरील घड्याळाचं चिन्ह काढून टाकलं. त्यावेळी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले होते. आता मात्र शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर अजित पवार गट दावा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र पुण्यातील शहर कार्यालय प्रशांत जगताप यांच्या नावावर असल्यामुळे अजित पवार गटाला कायदेशीर दावा करता येणार नाही. प्रशांत जगताप यांनी माहिती दिली आहे. ही जागा जगताप यांनी भाडे तत्त्वावर घेतल्यामुळे अजित पवार गटाला दावा करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यालयावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
या कार्यालयावर दावा करण्यासाठी आजही अजित पवार गटाचे कार्यकर्ते येण्याची शक्यता आहे किंवा कार्यकर्त्यांमध्येदेखील वादावादी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.